माफीयांच्या दबंगगिरीला प्रशासनाची पाठराखण!

चांदूरबाजार :- चांदूरबाजार तालुक्यात अवैध धंद्यांची साखळी वाढत असून, या धंद्यांना माफियांची दबंगगिरी आणि प्रशासनाची मूक संमती लाभत असल्याची जोरदार चर्चा आहे.
आधे तेरे, आधे मेरे, जनता उपाशी मरे” या म्हणीप्रमाणे परिस्थिती भयावह बनली आहे. दिवसा ढवळ्या खुलेआम दारू, रेती, आणि गोवंश तस्करी सुरू असून, प्रशासन या घटनांकडे कानाडोळा करत आहे.
रेती तस्करी :-
चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा, फुबगाव, हिरूळपूर्णा, आणि आसेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी केली जात आहे. दिवसा ढवळ्या आणि मध्यरात्री रेतीची वाहतूक होत असून, ट्रॅक्टर आणि डंपर सर्रासपणे धावत आहेत.
दारू विक्री :-
माधान, देउरवाडा, शिरजगाव, थुगाव पिपरी, बेलोरा, सोनोरी, आणि ब्राथंडी या भागांमध्ये खुलेआम देशी दारूची विक्री आणि वाहतूक होत आहे. पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने अवैध धंदे जोमात सुरू आहेत.
तालुक्यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविषयी रोष निर्माण झाला आहे. लाखो रुपयांची उलाढाल या माफियांच्या माध्यमातून होत असून, त्यांना मिळणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय पाठिंब्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
नागरिकांची मागणी :-
अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई व्हावी, रेती तस्करांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी. गोवंश तस्करी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. जर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडेल आणि मोठ्या आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.