जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद
मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन ,वेव्हज (WAVES) या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. जीओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटर, मुंबई येथे दि.१ ते ४ मे २०२५ रोजी ही परिषद होईल. या परिषदेमध्ये भारतातील जागतिक स्तरावरील मिडीया आणि मनोरंजन क्षेत्रातली उद्योजक, धोरणकर्ते आणि नवकल्पनाकार सहभागी होणार असून ‘मिडीया आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योगाच्या संधी आणि आव्हाने’ यावर परिषदेत चर्चा केली जाईल. या पार्श्वभूमीवर या परिषदेची नियोजनबद्ध तयारी सर्व विभागांनी समन्वयातून करावी असे निर्देश सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या दालनात जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES) आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव संजीव शंकर, सी. सेंथिल राजन, अजय नागभुषण एम एन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव पी.अन्बलगन, ‘एमआयडीसींचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू,उद्योग आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,फिल्म डिव्हीजनच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, विशेष पोलिस महासंचालक देवेन भारती,मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यासह केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक, आकाशवाणी,दूरदर्शन आणि वेव्हज परिषदेचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
भारतीय माध्यम क्षेत्र जागतिक स्तरावर
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, जगभरातील एकात्मतेसाठी भारतीय आध्यात्मिक वारसा जपणे,भारताला जागतिक कंटेंट हब आणि सामग्रीचा मोठा निर्यातदार बनवणे, बौद्धिक संपत्तीची समृद्ध परिसंस्था तयार करणे, भारतीय संस्कृती व भाषांची विविधता जपणे,भारतीय माध्यमांची जागतिक बाजारातील उपस्थिती वाढवणे,भारताला मोठ्या जागतिक गुंतवणूक बाजारपेठेचा केंद्रबिंदू बनवणे, भारतीय आणि जागतिक भागीदारांमध्ये सहकार्य आणि गुंतवणूक वाढवणे हा परिषदेचा उद्देश आहे. विविध देशांचे प्रतिनिधी, भारतीय उद्योग प्रतिनिधी आणि व्यापारी संघटना, राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आलेले प्रतिनिधी,कंपन्या आणि स्टार्टअप्स,तंत्रज्ञान कंपन्या,सह-उत्पादन कंपन्या आणि चित्रपट निधी संस्था, खरेदीदार आणि विक्रेते, विशेष कौशल्य असलेले प्रतिनिधी – दिग्दर्शक, निर्माते, सामग्री निर्माते, पटकथा लेखक यामध्ये सहभागी होतील असे जाजू यांनी सांगितले.
नवोन्मेषी मीडिया आणि मनोरंजन तंत्रज्ञान विषयांचे प्रदर्शन
श्री. जाजू म्हणाले की, ही परिषद चित्रपट, टीव्ही, ब्रॉडकास्ट, प्रिंट, रेडिओ, वृत्तपत्रे, नवीन मीडिया, जाहिरात, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, ई-स्पोर्ट्स, एआर,व्हीआर,एक्स आर, संगीत, लाइव्ह इव्हेंट्स इत्यादी मनोरंजनाशी संबंधित सर्व उद्योग क्षेत्रांवर भर देईल. याशिवाय चित्रपट आणि व्हिडिओ निर्मिती उपकरणे व तंत्रज्ञान, व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) उपाय, प्रगत कॅमेरा आणि चित्रिकरण तंत्रज्ञान,प्रसारण आणि स्ट्रीमिंग सोल्यूशन्स,डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सामग्री वितरण नेटवर्क,अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स साधने, गेमिंग तंत्रज्ञान आणि परस्परसंवादी अनुभव, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इमर्सिव्ह अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान ट्रेंडसह नवोन्मेषी मीडिया आणि मनोरंजन तंत्रज्ञान या विषयांचे प्रदर्शन या परिषदेत करण्यात येईल.
‘मीडिया आणि मनोरंजन’ क्षेत्राला नवीन संधी
या परिषदेच्या संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना जाजू म्हणाले की, संपूर्ण ‘मीडिया आणि मनोरंजन’ क्षेत्रासाठी ही शिखर परिषद म्हणजे एक जागतिक व्यासपीठ आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जागतिक मीडिया आणि मनोरंजन उद्योगाशी भारतातील या क्षेत्राची सांगड घालून या क्षेत्राचा विकास करणे हा आहे. २०२४ मध्ये ‘मीडिया आणि मनोरंजन’ हा जागतिक उद्योग सुमारे २.९६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सवर पोहोचत आहे. अशा वेळी आपल्या देशात होणारी वेव्हज ही शिखर परिषद या उद्योगाच्या वाढीस चालना देणारी ठरेल . ‘मीडिया आणि मनोरंजन’ क्षेत्राला यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच भारताचा मीडिया आणि मनोरंजन उद्योग क्षेत्र २०२९ पर्यंत सुमारे ५०० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचेल. वेव्हज (WAVES) या क्षेत्राच्या वाढीस मदत करण्यासाठी आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी कार्य करेल. तसेच, धोरणात्मक सुधारणा आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देईल.
मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की,राज्यात होणाऱ्या या जागतिक परिषदेच्या तयारीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. प्रत्येक विभागाने समन्वय साधून नोडल ऑफीसर नेमून कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे. परिषदेचे पूर्ण नियोजन, कार्यक्रम, पाहुण्यांचे आगमन व निर्गमन, प्रचार व प्रसिद्धी, आदरातिथ्य, पाहुण्यांची सुरक्षितता, पायाभूत सोयीसुविधा या प्रत्येक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश मुख्य सचिव सौनिक यांनी दिले.