दहावीचा गणिताचा पेपर फुटला, झेरॉक्स दुकानात उत्तरपत्रिकांची विक्री सुरू

अमरावती, चांदूरबाजार :- गेल्या काही दिवसांपूर्वी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात दहावीचे पेपर फुटल्याची बातमी आली होती. त्यानंतर मोठा गदरोळही झाला होता. आता अमरावती जिल्ह्यात आज (७ मार्च) होणारा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील १०० मीटरच्या आत असणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर गणित पेपरच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
दहावीचा गणिताचा पेपर असल्याने या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलिस पॅट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना जिजामाता शाळेच्यासमोर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये काही मुले दहावीच्या गणित पेपरच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स काढून घेऊन जाताना दिसले. त्या विद्यार्थ्यांना दुकानदारसुद्धा झेरॉक्स काढून कॉपी पुरविण्यामध्ये सहकार्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली. पोलीस झेरॉक्स दुकानाजवळ गेले असता दुकानात जमा असलेले मुले पोलिसांना पाहून पळून गेली. दुकानाच्या आतमध्ये गेले असता एक व्यक्ती झेरॉक्स मशिनवर झेरॉक्स काढताना दिसला. काढलेल्या झेरॉक्सची पाहणी करून झेरॉक्स ही १० वीच्या गणिताच्या पेपरची उत्तरांची नक्कल असल्याचे दिसून आले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
यापूर्वीही जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात दहावीचे पेपर फुटले होते. यवतमाळमधील आदर्श विद्यालय कोठारीच्या केंद्रावर २२१ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यासाठी २२५ प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. उर्वरित चार प्रश्नपत्रिकांपैकी एक चोळामोळा केलेली आढळली. केंद्र संचालक तासके याने हीच प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून आले होते.
कॉपीमुक्त परीक्षेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील कोठारी आदर्श विद्यालयातून दहावीच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. उत्तरपत्रिका वाटप सुरू असतानाच ही प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यात आली होती. याप्रकरणात मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक श्याम तासकेंसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.