ध्यान तणावमुक्त जीवनाची संजीवनी – सुप्रिया चकोले

अमरावती :- आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात लहानापासून ते मोठ¬ापर्यंत तणाव हा सर्वांना उद्भवतो आणि त्याचा दुष्परिणाम व्यक्तीवर शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या व्याधींच्या स्वरूपात दिसून येतो. यावर न्यूरो सायन्स तज्ञ म्हणतात की, मेंदूमध्ये सिरो टोनीन आणि डोपा मीन यांसारख्या आनंददायी संप्रेरकांची ध्यान केल्यास निर्मिती होते, यासाठी ध्यान हे एक सुखी व शांत जीवन संजीवनीचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. सुप्रिया चकोले यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. योगशास्त्र, पी.जी. डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, योगिक सायन्स आणि पी.जी. डिप्लोमा इन योगा थेरपी अभ्यासक्रमाच्यावतीने राज्यस्तरीय कार्यशाळेच्या पाचव्या सत्रात “योग : भावनिक व मानसिक स्वास्थ आणि जीवनशैली व्यवस्थापन जागरूकता” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. नरेश बुराडे उपस्थित होते.
डॉ. सुप्रिया चकोले पुढे म्हणाल्या, तणाव प्रतिबंधासाठी ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे. ध्यान केवळ डोळे बंद करून बसणे नव्हे, तर तो मनाच्या खोलावर जाणारा प्रवास आहे. याप्रसंगी त्यांनी ध्यान करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगून ध्यानामुळे होणाया शारीरिक, मानसिक व भावनिक फायद्याबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. नरेश बुराडे यांनी ध्यानाचे महत्त्व सांगून धावपळीच्या जीवनशैलीत ध्यान हा आत्मशोधाचा मार्ग आहे तसेच ध्यानामुळे मनशक्ती विकास व मेंदूची कार्यक्षमता वाढते, असेही ते म्हणाले. संचालन प्रा. आदित्य पुंड यांनी, तर आभार प्रा. राधिका खडके यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील योग अभ्यासक, विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.