पुण्यानंतर सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर

सांगली :- पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीसोबत बलात्काराची घटना घडली होती. या घटनेमुळे पुण्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र हादरला होतात. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्या आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीसोबत ही घटना घडली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाने तरुणीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बस स्टँडवर आल्यानंतर तरुणीने आरडाओरडा करत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयिताला पकडले आणि चोप देत पोलिस ठाण्यात आणले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने राहते. पीडित तरुणी परवा स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी इस्लामपूरजवळ संशयित वैभव कांबळे हा बसमध्ये चढला. तरुणीच्या मागील बाजूला असणाऱ्या सीटवर तो बसला होता. रात्री ११ वाजता आष्ठावरून सांगलीकडे येत असताना संशयित कांबळे हा वारंवार खिडकीजवळून पीडितेला स्पर्श करून अश्लील चाळे करू लागला.
रात्रीची वेळ असल्याने पीडित तरुणी भयभीत झाली होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस सांगली स्थानकात आली असता पीडितीने घडलेला प्रकार चालकासह तेथील पोलिसांना सांगितला. तेवढ्यात संशयित तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.