पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? मोठी घडामोड!

सर्वसामान्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी! देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.कारण, युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी केले असून,आता कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. काय आहे यामागचे गणित? आणि पेट्रोल पंप चालक सौरभ जगताप यांची काय प्रतिक्रिया आहे?
पाहुया या खास रिपोर्टमध्ये…
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करण्यास सुरुवात केली. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने तब्बल 112.5 अब्ज युरोंचे कच्चे तेल विकत घेतले आहे! भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश बनला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात सतत घसरत आहेत.
विशेषत: 60 डॉलर प्रति बॅरलपर्यंत दर घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जर हे दर असेच कमी झाले, तर भारतातील पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. अमरावतीतील रुख्मिणी नगर येथील पेट्रोल पंप चालक सौरभ जगताप यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले: “सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत कमी होत आहेत. जर सरकारने याचा थेट फायदा नागरिकांना दिला, तर लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर घसरणार आहेत. हे सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा असेल!”
दर कमी होण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तरीही, उत्पादन शुल्क, राज्य सरकारांचे कर यामुळे इंधन दर त्वरित कमी होईल की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. जर सरकारने कर कपात केली, तर लिटरमागे किमान ₹5-₹10 पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरू शकतात! इंधन दरवाढीमुळे आधीच महागाईचा बोजा वाढला आहे. जर पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले, तर वाहतूक खर्च कमी होईल आणि महागाईत घट होईल. नागरिक आता सरकारच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत!