मुख्यमंत्री ग्रामसडक योजना: जसापुर फाटा ते पिंपरी रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिक आक्रमक

चांदुर बाजार :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चांदुर बाजार तालुक्यातील जसापुर फाटा ते पिंपरी रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवघ्या 6.82 किमी अंतराच्या या रस्त्याचे अक्षरशः चाळण झाले असून, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यावर दररोज अपघात होत असून, प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील जसापुर फाटा ते पिंपरी हा 6.82 किमी लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 9.63 कोटी 22 लाखांच्या निधीतून मंजूर करण्यात आला होता. मात्र, केवळ काहीच महिन्यांत हा रस्ता खचला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अपुऱ्या प्रमाणात सिमेंट आणि गिट्टी वापरल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी या कामाविषयी तक्रार केल्यानंतर अधिकारी व ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करत तक्रारींची दखल घेतली असून, दोषी ठेकेदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
ग्रामस्थांच्या मते, या मार्गावरून विद्यार्थी, भाविक आणि स्थानिक नागरिक दररोज प्रवास करतात. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे. नुकताच एका अपघातात जसापुर गावातील इसम गंभीर जखमी झाला. मात्र, अद्यापही दुरुस्तीचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून ठेकेदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे वाढत्या अपघातांचे प्रमाण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. जसापुर फाटा ते पिंपरी या मार्गाची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आता प्रशासन कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.