योग्य सवयी आणि सकारात्मक विचारसरणी हेच सर्वश्रेष्ठ औषध – डॉ. प्रियंका शेळके

अमरावती :- तणाव हा आधुनिक जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला असून त्यामुळे शरीर व मनावर होणाया परिणामांकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज आहे. न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर तणावाचे परिणाम मेंदूच्या कार्यप्रणालीवर थेट परिणाम करतात. सततच्या मानसिक दडपणामुळे मेंदूमधील न्यूरोट्रांसमीटरच्या संतुलनात बिघाड होतो, ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि एकूणच मानसिक अस्थिरता वाढते. पर्याय निसर्गोपचार तणाव व्यवस्थापनासाठी एक प्रभावी उपचार आहे. त्यावर योग्य सवयी आणि सकारात्मक विचारसरणी हेच सर्वश्रेष्ठ औषध असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रियंका शेळके यांनी केले. विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. योगशास्त्र, पी.जी. डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स आणि पी.जी. डिप्लोमा इन योगथेरपी अभ्यासक्रमाच्यावतीने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, तिसया सत्रात “ताण व्यवस्थापनासाठी न्यूरोसायन्स आणि निसर्गोपचार” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. अनघा देशमुख उपस्थित होत्या.
डॉ. प्रियंका शेळके पुढे म्हणाल्या, आपल्या आचार-विचारांवर नियंत्रण ठेवले, तर मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहते. न्यूरोसायन्सच्या मदतीने तणाव कसा कार्य करतो, हे समजून घेतल्यास त्यावर उपाय शोधणे सोपे होते. निसर्गोपचारातील तत्त्वे वापरून शरीर व मनाच्या सुसंवादातून तणावमुक्त जीवन जगता येते. योग्य आहार, संतुलित दिनचर्या, नियमित व्यायाम, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापन सहज शक्य आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी न्यूरोसायन्सआणि निसर्गोपचार यांचा समतोल वापर करणे अत्यंत फायदेशीर असल्याचेही त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनघा देशमुख म्हणाल्या, डॉ. शेळके यांनी न्यूरोसायन्स आणि निसर्गोपचाराच्या आधारे तणाव व्यवस्थापनाचे विज्ञान समजावून सांगितले. तसेच योग, ध्यान आणि संतुलित आहार यांचा मेंदूच्या कार्यप्रणालीवर होणारा सकारात्मक परिणाम त्यांनी सखोलपणे स्पष्ट केल्यामुळे श्रोत्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सत्राचे संचालन प्रा. आदित्य पुंड यांनी, तर आभार प्रा. मयूर वीरुळकर यांनी मानले. कार्यशाळेला शहरातील योग अभ्यासक, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.