अंधाराला शिव्या घालत बसाल, तर प्रकाशाची वाट कशी मिळेल – डॉ. अलका गायकवाड
अमरावती :- अंधाराला शिव्या घालत बसाल, तर प्रकाशाची वाट कशी मिळेल, असा मौलिक सल्ला भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या माजी मराठी विभागप्रमुख व कार्यशाळेच्या बीजभाषक डॉ. अलका गायकवाड यांनी उपस्थित महिला व विद्यार्थीनींना दिला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रम आणि मातोश्री मुलींचे वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले आणि महिला सक्षमीकरण या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत बीजभाषण देतांना त्या बोलत होत्या. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, उद्घाटक म्हणून डॉ. अऩुराधा गुडधे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
डॉ. अलका गायकवाड पुढे म्हणाल्या, संत गाडगे बाबांनी महिला उत्थानाची दिशा दिली. समाजामध्ये विशेषत: महिला व पुरुषांमध्ये सुसंवाद वाढला पाहिजे. सत्कार हा नेहमीच प्रेरणादायी असतो. समाजव्यवस्थेमध्ये विसंगती दिसून येते. स्त्री बदलते आहे, कर्तव्याची टप्पे ती पार करीत आहे, पण पुरुषी मानसिकता देखील बदलली पाहिजे. माणूस म्हणून स्त्रीकडे पाहण्याची आज खरी गरज आहे. तिला भयमुक्त करण्याची जबाबदारी समाजाची आहे. समानतेवर आधारित समाजव्यवस्था आज निर्माण करण्याची गरज असून महिला व पुरुषांनी एकत्र लढले पाहिजे. त्यासाठी वातावरण निर्मिती करावी लागेल आणि त्याशिवाय महिला सक्षमीकरण होणार नाही. त्या म्हणाल्या, स्त्री सक्षमीकरणातील उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे फुले दाम्पत्य होय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे कार्य पुढे नेले. महिला उपजत सक्षम आहेत, मात्र त्या धैर्याने पुढे येत नाहीत. त्यामुळे सवित्रीबाई फुले यांचे पैलू महिलांनी अंगिकारले पाहिजेत. अंधाराला शिव्या घालत बसाल, तर प्रकाशाची वाट कशी मिळेल, असा प्रश्नही डॉ. अलका गायकवाड यांनी यावेळी उपस्थितांसमोर उपस्थित केला. त्या म्हणाल्या, बुध्दीप्रामाण्यवाद, विवेक आणि विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवल्यास महिला आहेत त्यापेक्षाही अधिक सक्षम होतील.
कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची रितसर घोषणा डॉ. अनुराधा गुडधे यांनी केली. डॉ. मनिषा कोडापे म्हणाल्या, कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितच महिलांमध्ये जागृतीकरणाचा प्रयत्न आजीवन अध्ययन विभागाकडून होतो, ही बाब निश्चतच प्रशंसनीय आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, अशा कार्यशाळेच्या माध्यमातून समाजप्रबोधनासोबतच वैचारिक प्रबोधनही होत आहे आणि येत्या काळात समाजामध्ये निश्चितच त्याचा परिणामही दिसेल. विद्यार्थीनींनी आत्मवि·ाासाने पुढे आले पाहिजे. कार्यशाळेत जे बीजारोपण झाले, त्याचा प्रभाव पुढे दिसणार आहे. स्त्रीशिवाय जग नाही, सर्वांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी, काळाच्या ओघात वाहवत जावू नये, याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे व कौटुंबिक सुसंवादही वाढविला गेला पाहिजे, असेही कुलसचिव डॉ. असनारे म्हणाले.
याप्रसंगी आजीवन अध्ययन विभागातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी यस्कीन निखत, रश्मी उमंडे, देवाशीष व सौ. जोगळेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यापीठाच्या डॉ. अनिता पाटील, डॉ. सुजाता काळे, डॉ. मंजुषा बारब्दे, सौ. मोनाली तोटे पाटील यांचा महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या हस्ते रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संत गाडगे बाबा, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकातून डॉ. श्रीकांत पाटील यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा बारब्दे यांनी, तर आभार प्रा. प्रियंका तायडे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठातील विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, महिला कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.