जागतिक महिला दिना निमित्य .सौ सुलभाताई खोडके यांची राज्यविधिमंडळात मागणी..
मुंबई :- मागील २० वर्षात राज्याच्या विधीमंडळाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना ,अभियान व उपक्रम राबविले आहेत. हिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, बचतगट, स्त्रीभ्रूण हत्या निर्मूलन आदींच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचे काम करण्यात आले. परंतु दिवसेंदिवस वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे आज महिला सुरक्षितलेला घेऊन सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोलत असतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी महिलांची सुरक्षा, आरोग्य, रोजगार तसेच सक्षमीकरणाचे मुद्दे मांडून महिला शक्तीचा आवाज बुलंद केला.
याबाबत सभागृहाला अवगत करतांना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की देशाला व महाराष्ट्र राज्याला कर्तबगार, कर्तृत्ववान व पराक्रमी अशा थोर महिलांचा गौरवशाली इतिहास आहे. एक स्त्री समाजाला किती प्रेरणा देऊ शकते आणि परिवर्तन घडवू शकते. ते त्या थोर महिलांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समानता प्रस्थापित झाल्याने महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला , शिक्षण मिळाले असल्याने आज त्या सर्वच क्षेत्रात चांगले काम करत आहे. परंतु उच्चशिक्षित असून सुद्धा आज महिलांना रोजगार व नोकरी मिळत नसल्याने त्यांना पाहिजे तशी संधी मिळत नाही. म्ह्णून शासनाच्या अनेक विभागांमध्ये जागा रिक्त असल्याने त्या जागांवर सुशिक्षित व उच्चशिक्षित महिलांना संधी देऊन त्यांना रॊजगार व नोकरी देण्याची विनंती आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी सभागृहात उपस्थित मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना केली.
महिलांच्या आरोग्याकडे सुद्धा आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी प्रकर्षाने बोलतांना दिवसेंदिवस महिलांना शिक्षण मिळत असतांना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आमदार महोदयांनी सभागृहाला अवगत केले. महिलांमध्ये कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढत असून गरीब व आर्थिक दृष्टीने कमकुवत घटकांतील महिला रुग्णांना उपचाराला घेऊन अनेक अडचणी निर्माण होतात. महात्मा फुले योजनेतून शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र औषधीसाठी पैसे मिळत नाही. म्हणून महिला कँसरग्रस्तांना औषधोपचार साठी आरोग्यखात्यांच्या माध्यमातून मदत देण्यात यावी अशी मागणी सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहा समक्ष केली आहे.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी व काम करण्याची संधी मिळावी म्ह्णून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या, या मागणीकडे सुद्धा आमदार महोदयांनी अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास महिलांना काम करण्याची संधी मिळेल. याबाबत सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहाला अवगत केले. त्याच बरोबर आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून तमाम महिला शक्तींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे.
जागतिक महिला दिना निमित्य सभागृहात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी महिला विकासासंर्भात मांडलेल्या अनेक मुद्यांचे सर्वानीच अभिनंदन केले. यावेळी सभागृहात विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर , मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्यासह महिला आमदार व विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.