नागपुरात बनावट गुड नाईट लिक्विड! – पोलिसांची धडक कारवाई

नागपुर :- नागपुरात मोठा बनावटगिरीचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध गुड नाईट लिक्विडचा डुप्लिकेट प्रकार बाजारात विक्रीस आल्याची माहिती कंपनी प्रतिनिधींनी पोलिसांना दिली. यानंतर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अनेक दुकानदारांवर छापे टाकून बनावट लिक्विड जप्त केले आहे. चला, पाहूया संपूर्ण अहवाल.
नागपूरमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा मोठा बनावट गिरीचा प्रकार समोर आला आहे. गुड नाईट कंपनीच्या नावाने बनावट लिक्विड विक्रीस आल्याची माहिती मिळताच, कंपनीच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हे शाखेने युनिट क्रमांक ३ च्या मार्गदर्शनाखाली मोठी मोहीम हाती घेतली.
गणेशपेठ, पचपावली, लकडगंज आणि जरीपटका या भागांतील किराणा दुकानांवर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट गुड नाईट लिक्विडचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून संबंधित दुकानदारांवर कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक ३ चे पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागपूरमध्ये आणखीही अशी बनावट उत्पादने विक्री होत असल्याचा संशय असून, लवकरच आणखी कारवाई केली जाणार आहे. बाजारात बनावट उत्पादने मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. ग्राहकांनी अशी उत्पादने खरेदी करताना सतर्क राहावे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे.
नागपूरमध्ये बनावटगिरीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ग्राहकांनीही अशा वस्तू खरेदी करताना अधिक सतर्कता बाळगावी. पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण नागपूरवासियांचे लक्ष लागले आहे. नागपूरमधील गुन्हेगारीविषयी अधिक अपडेट्ससाठी CITY NEWS सोबत राहा.