नाशिकमध्ये तरुणाची धारधार शस्त्राने हत्या; ३ ताब्यात, दोघांचा शोध सुरू

नाशिक :- नाशिकमध्ये टोळक्यांनी तरुणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको परिसरातील खुंटवड नगरमध्ये राहणाऱ्या तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भोसला स्कूलमागील संत कबीर नगरमधील रस्त्यावर हा रक्तरंजीत कांड घडला. अरुण राम बंडी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अरुण बंडी शनिवारी रात्री भोसला स्कूलमागील संत कबीर नगरमध्ये आला होता. या ठिकाणी जुन्या वादातून सातपुरच्या टोळक्याने त्याला घेरत त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अरुणचा जागीच मृत्यू झाला. अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.
या टोळक्याने परिसरातील दोन दुचाकीची तोडफोड देखील केली. या घटनेनंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले होते. पोलिसानी ३ संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले तर दोघे जण फरार असून त्यांचा शोध घेत आहेत. अरुणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. रुग्णालयाबाहेर त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सरकारवाडा पोलिस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात हत्येाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.