जूना कॉटन मार्केटमध्ये हॉटेल आदर्शमध्ये व्यापाऱ्याला जीवघेणा हल्ला!

अमरावती :- जूना कॉटन मार्केटमध्ये हॉटेल आदर्शमध्ये झालेल्या वादातून मोठा गोंधळ उडाला! सम्राट मेंसवेअर शोरूमचे मालक पुरुषोत्तम हरवानी यांच्यावर हॉटेल मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाद इतका टोकाला गेला की हॉटेल मालकाने काचेचा ग्लास त्यांच्या डोक्यावर फोडला. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्वी पुरुषोत्तम हरवानी हे हॉटेल आदर्शचे मालक होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी हे हॉटेल राजेश तलरेजा यांना विकले होते. ९ मार्च रोजी रात्री तलरेजा यांनी हरवानी यांना हॉटेलमध्ये बोलावले आणि दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की राजेश तलरेजा यांनी त्यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला.
या प्रकरणी पुरुषोत्तम हरवानी यांचा मुलगा आदर्श हरवानी यांच्या तक्रारीवरून हॉटेल मालक राजेश तलरेजा, नारायण तलरेजा, कमल नवलानी, सूरज, हिरुळकर आणि एका अनोळखी महिलेवर सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कलम ११५ ( २)११८( १) ३५१ ( २) ३५२. १८९( २) १९०( २) १९१(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) जप्त केले असून, कमल नवलानीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला एका महिलेने आदर्श हरवानी, पुरुषोत्तम हरवानी आणि वीरभान झाम्बानी यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिलेला हात पकडणे, दुपट्टा ओढणे आणि शरीरसंबंधी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचे बनले असून, सिटी कोतवाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
जूना कॉटन मार्केटमधील हॉटेल आदर्शमध्ये झालेला हा वाद आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. एका बाजूला जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा तर दुसऱ्या बाजूला छेडछाडीची तक्रार दाखल झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.