पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला अट्टल गुन्हेगार अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात!

नागपूर :- नागपूर पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. तब्बल अडीच महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला मालवण येथे अटक करण्यात आली आहे. दिल्ली, अजमेर ते मुंबई असा मोठा तपास करून अखेर जरीपटका पोलिसांनी आरोपीला पकडले आहे.
सविस्तर पाहूया ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट :
२६ वर्षीय अजय राजेश बोरकर उर्फ अज्जू, हा इंदोरा-जरीपटका परिसरातील अट्टल गुन्हेगार. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने ३१ डिसेंबर २०२४ रोजी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारागृहात नेत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो पसार झाला होता.
त्यानंतर जरीपटका पोलिसांनी संपूर्ण जिल्हा आणि परराज्यात शोधमोहीम राबवली. अनेक ठिकाणी लोकेशन मिळत असताना आरोपी पोलिसांच्या हातात सापडत नव्हता. मात्र, अखेर मुंबईत त्याच्या हालचालींचा ठावठिकाणा लागला. दोन दिवसांपूर्वी जरीपटका पोलीस उपनिरीक्षक किल्लेदार, पोलीस कर्मचारी प्रमोद सालोडकर, विकास पाठक आणि डीबी पथकाने मालवण येथे मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली.
तब्बल अडीच महिन्यांच्या तपासानंतर नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपी अजय बोरकर पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. या संपूर्ण कारवाईबाबत जरीपटका पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सिटी न्यूजला अधिकृत माहिती दिली आहे. पुढील तपास जरीपटका पोलीस करत आहेत. या प्रकरणातील अधिक अपडेट्ससाठी बघत राहा सिटी न्यूज!