मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती आराखड्यान्वये लोकशाही दिनाची प्रभावी अंमलबजावणी करा – अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी
अमरावती :- शासकीय विभागांकडे दाखल होणाऱ्या जनतेच्या तक्रारींचे तत्काळ निवारण तसेच जनकल्याणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शासकीय विभागांसाठी 100 दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा निश्चित केला आहे. त्यानुसार विभागातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तत्काळ निपटारा होण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी यांनी आज येथे दिले.
विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा अंतीम अहवाल वेळेत प्राप्त करुन प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागप्रमुखांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असेही श्री. सिध्दभट्टी यांनी सांगितले. लोकशाही दिनात दाखल एकूण चौदा प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्री. सिध्दभट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. उपायुक्त संतोष कवडे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांचे महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 5 स्वीकृत अर्ज (प्रलंबित प्रकरणे) व 9 अस्वीकृत अर्ज (सामान्य तक्रार अर्ज) अशा एकूण 14 तक्रार अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली. तसेच तक्रारदारांच्या अर्जाच्या अनुषंगाने दहा दिवसात कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
लोकशाही दिनासाठी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. सिध्दभट्टी यांनी संबंधित विभागांना यावेळी दिले.