विद्यापीठात महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य विभागातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ परिसरात कार्यरत महिला कर्मचारी, उद्यान व साफसफाई महिला कर्मचारी यांचेकरीता नुकतेच आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.एच.पी. नांदुरकर, आहारतज्ज्ञ डॉ. दिपाली भैसे, प्रमुख अतिथी म्हणून उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. सपना गुप्ता व विद्यापीठ आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात उपस्थित होत्या.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आहारतज्ज्ञ डॉ. दिपाली भैसे म्हणाल्या, स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला विविध आजारांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता स्त्रियांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे. तसेच आपल्या किराण्याच्या यादीतून तेल आणि साखरेचे प्रमाण कमी करावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील व डॉ. सपना गुप्ता यांनी आहाराविषयी मार्गदर्शन करुन सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
अध्यक्षीय भाषणातून विभागप्रमुख डॉ.एच.पी. नांदुरकर म्हणाल्या, आहार व व्यायाम हे दोनही शरीरासाठी महत्वाचे घटक असून त्याबाबत सर्वांनी जागरुक रहावे. तसेच शिबीरामध्ये सहभागी सर्व महिलांनी रक्त व अन्य तपासण्या करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रास्ताविकतेतून आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी आरोग्य शिबीर कार्यक्रमामागील भूमिका मांडली. आरोग्य शिबीरामध्ये सी.बी.सी. टी.एस.एच., एल.एफ.टी., के.एफ.टी. आदी तपासण्या करण्यात आल्या. रक्त तपासणीकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयातील एच.एल.एल. चमू, तर कॅन्सर व ब्रोस्ट तपासणीकरीता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची चमू उपस्थित होती. एकूण 150 महिलांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला व 60 महिलांची रक्त तपासणी यावेळी करण्यात आली. शिबीराचे संचालन डायबेटीक असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी श्री राजेश पिदडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दिनेश हिवराळे, सचिन बाळापुरे, प्रतिक्षा सोळंके, इर्षा काळे, धीरज राऊत, कृष्णा देवतळे व अंकिता गणविर यांनी परिश्रम घेतलेत.