विद्यापीठ रिसर्च आणि इनक्यूबेशन फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे भव्य आयोजन
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इनक्यूबेशन फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांचे सशक्तीकरण वाढविणे आणि स्टार्टअप संस्कृतीमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करणे हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, अमरावतीचे उपायुक्त श्री डी. एल. ठाकरे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरकर उपस्थित होते.
सर्वप्रथम कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे हस्ते श्रीमती शिवानी बापट, संचालक, कृष्णमय आयुर्योग, डॉ. केतकी कालेले, संचालक, वार्कास रिसर्च अॅन्ड इन्नोव्हेशन्स, श्रीमती नेहा मोटवानी, संचालक, प्रॉक्सी अॅग्रोटेक, सुश्री रुबीना चाँद शेख, संचालक, इनशिराह हर्बल या यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. कुलगुरू पुढे म्हणाले, आजची स्त्री केवळ घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत नाही, तर ती उद्योग, स्टार्टअप आणि नवकल्पनांमध्येही स्वतःची ओळख निर्माण करत आहे. सर्वांनी अशा महिलांकडून प्रेरणा घेवून त्यांच्या कार्याला पाठिंबा द्यावा, असेही ते म्हणाले.
प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे उपायुक्त श्री डी. एल. ठाकरे यांनी महिला उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून समाजात आता खयाअर्थाने नव्या परिवर्तनाची सुरुवात केली असल्याचे सांगितले. इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका मांडली.
सन्मानित महिला उद्योजक आणि त्यांचे स्टार्टअप्स
श्रीमती शिवानी बापट, संचालक, कृष्णमय आयुर्योग प्रा.लि. यांचा स्टार्टअप आयुर्वेदिक आणि नैसर्गिक वैद्यकीय उपचारांवर केंद्रित असून त्यांनी महिलांच्या आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. केतकी कालेले, संचालक, वार्कास रिसर्च अॅन्ड इन्नोव्हेशन्स प्रा.लि. ही कंपनी बायोटेक्नॉलॉजी आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी हेल्थकेअर इनोव्हेशनमध्ये महत्त्वाचे संशोधन केले आहे. श्रीमती नेहा मोटवानी, संचालक, प्रॉक्सी अॅग्रोटेक प्रा.लि. यांचा स्टार्टअप कृषी क्षेत्रात तांत्रिक नवकल्पना आणत असून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयंपूर्ण बनवत आहे. सुश्री रुबीना चाँद शेख, संचालक, इनशिराह हर्बल ही कंपनी हर्बल आणि नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असून महिलांसाठी आरोग्यवर्धक आणि जैविक उत्पादने उपलब्ध करून देतो.
विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता व्यवस्थापक श्री अमोल हिरुळकर, श्री नरेश मोवळे, श्री रविकुमार ढेंगळे व ऋषिकेश खवणे यांनी अथक परिश्रम घेतले.