शेतकरी कर्जमाफीसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभ व प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी..
मुंबई :- राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योज़ना जाहीर केली. मात्र बहुतांश पात्र लाभार्थीं हे गेल्या ८ वर्षापासून कर्जमाफीपासून अद्यापही वंचित आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ व प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या माध्यमातून केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सन २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच सन २०१९ महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेमध्ये दिनांक ३० जून २०१६ पर्यंतच्या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार होते. तर दीड लाखांच्यावरील कर्जदारांची एक रकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांनी दीड लाखाच्यावरचे कर्ज भरल्यास दीड लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार येणार होते. तसेच सन २०१५-१६ आणि सन २०१६-२०१७ या दोन वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला होता. या योजनेची प्रभावी अंमलबजाणी करण्यात आली का ? असा प्रश्न मांडून आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी लक्ष वेधले आहे.
मागील ८ वर्षापासून योजनेच्या सर्व अटी- शर्तींची पूर्तता करूनही ६.५६ लाख पात्र शेतकरी ५,९७५ कोटी इतक्या रकमेच्या कर्जमाफी लाभापासून अद्यापही वंचित असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी करून सदर योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ व प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत शासनाने कार्यवाही करण्याची मागणी करीत आमदार महोदयांनी अधिवेशनाचे लक्ष वेधले आहे.
यावर लिखित उत्तर सादर करतांना राज्याचे सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पात्र असलेल्या ५०.६० लाख शेतकऱ्यांपैकी ४४.०४ लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६.५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यसचिव यांनी दिनांक २७-०३-२०२४ रोजी बैठक घेतली. सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांच्या पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राज्यस्तरीय बँकर्स समिती यांचेकडून पात्र व प्रलंबित असलेल्या लाभार्थींची माहिती प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु असल्याचे लिखित उत्तर सहकार मंत्री – बाबासाहेब पाटील यांनी दिली. त्याच प्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र असलेल्या ३२.४२ लाख शेतकऱ्यांपैकी ३२.२७ लाख इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली असल्याचे लिखित उत्तर मंत्रीमहोदयांनी दिले आहे.