राज्याच्या अर्थसंकल्पातून अमरावतीसाठी भरीव निधीची तरतूद करण्याची आ.सौ. सुलभाताई खोडके यांची मागणी

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच वर्ष २०२५-२०२६ करिता राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आज दिनांक १२ मार्च रोजी राज्य विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान अर्थसंकल्पावर चर्चा करतांना आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावतीच्या रस्ते विकास, आरोग्य सुविधा, उद्योग, रोजगार, पर्यटन विकास तसेच शहरी भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करीत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच या अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय देण्यात आला असून हा अर्थसंकल्प महाराष्ट्रला अनेक अडचणींमधून सावरून प्रगतीकडे नेणारा असल्याचे सांगून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांचेसह महायुती सरकारचे आभार मानीत अभिनंदन केले.
औद्योगिक धोरणांच्या बाबतीत बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये साकारण्यात येणाऱ्या मेगा टेक्स्टाईल पार्क लवकर सुरु करण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले. राज्याच्या अर्थसंकल्पात नवीन औद्योगिक धोरण २०२५ आणत असल्याचे जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये येत्या ५ वर्षांमध्ये ४० लाख कोटींची गुंतवणूक व ५० लाख रोजगार निर्मिती होणार आहे. असे सांगण्यात आले आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रामधे एकमेव अमरावती येथे मेगा टेक्स्टाईल पार्क सुरु केला आहे. त्या ठिकाणी रस्ते , वीज आदी ची कामे सुरु आहे. मात्र तेथील प्लॉट चे दर अमरावती शहरातील प्लॉटच्या दरापेक्षा जास्त आहे. ते दर जर कमी केले तर अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्क मध्ये चांगल्या कंपन्या येतील व गुंतवणूक करतील. व अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क लवकर सुरु होऊन उद्योग व रोजगाराला चालना मिळेल. तसेच महाराष्ट्रामध्ये चांगले व केंद्र शासनाचे चांगले उद्योग येण्यासाठी नवीन धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यामुळे ना. उपमुख्यमंत्री महोदयांनी याबाबत बैठक घेऊन नवीन औद्योगिक धोरण संदर्भात निर्णय घ्यावा, जेणेकरून टेक्स्टाईल पार्क लवकरात लवकर सुरु होईल ,असे सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करतांना सांगितले.
अर्थसंकल्पात इनोव्हेशन सिटी वर भर देण्यात आल्याने अमरावती येथील रोजगाराचा अनुशेष दूर करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी अभियांत्रिकी संस्थांमध्ये वर्क फ्रॉम टाऊन सुरु करण्यासंदर्भात अधिवेशनात घोषणा करावी अशा मागणीचा पुनरोच्चार सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आला.
अमरावती शहरातील शासकीय अभियांत्रिकी संस्थामध्ये ११५ एकर जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी स्पेशल पर्पज व्हीकल वर शासनाच्या कंपनीला कमी दराने जागा लीजवर देण्यात यावी. त्या ठिकाणी शासनाच्या कंपनीला चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे केल्यास,याठिकाणी नवीन इमारत उपलब्ध करून दिल्यास तेथे येणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून स्थानिक उमेदवारांना आपल्याच शहरात वर्क फ्रॉम टाऊन द्वारे रोजगाराच्या संधी मिळतील. त्यामुळे अर्थसंकल्पातील चर्चेमधील उत्तराचे भाषणात ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अमरावती येथे वर्क फ्रॉम टॉऊन सुरु करण्यासंदर्भात घोषणा करावी. अशी मागणी सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान रस्ते विकासा बाबतीत बोलतांना आमदार महोदयांनी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सुरक्षित वाहतुकीसाठी चांगले रस्ते निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. याकरिता अमरावती मध्ये पंचवटी चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक पर्यंत १३०० कोटींचा चारपदरी उड्डाणपूल निर्मितीच्या प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांना मंजुरी देऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा, तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत १,३०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली.
सोबतच ग्रामीण भागातील रस्ते विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा लेखा शीर्षाखाली निधी दिला जातो. त्याप्रमाणे शहरी भागासाठी सुद्धा शासनाने मुख्यमंत्री शहरी सडक योजना असा नवीन हेड तयार केला आहे. मात्र निधीबाबत कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. अमरावती शहराचा वाढता विस्तार व रस्ते निर्मितीच्या अनुषंगाने नगरोत्थान या शीर्षाखाली निधीचे नियोजन करतांना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मुख्यमंत्री शहरी सडक योजना या लेखाशीर्षा नुसार अर्थसंकल्पिय निधी तरतूद करण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.
आरोग्याच्या बाबतीत बोलतांना आमदार महोदयांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे जसे टप्पा १ व टप्पा २ इमारती सुरु आहेत. त्यामुळे तेथिल आरोग्य सेवांचा विस्तार व बळकटी करणाच्या अनुषंगाने टप्पा -तीन बाबत नियोजन करण्याला घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावास मंजुरी देऊन निधीची तरतूद करण्याची मागणी आ.सौं . सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून बोलतांना केली.
पर्यटन विकासाबाबत बोलतांना आ. सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की राज्याच्या अर्थसंकल्पात शासनाने पर्यटन विकासावर कोट्यवधी निधीची तरतूद केली. मात्र अमरावती शहरी -नागरी भागात कुठलेही पर्यटन क्षेत्र नसले तरी तेथिल शिव टेकडी व वडाळी तलाव , बांबु गार्डन हि काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. या स्थळांचा पर्यटन क्षेत्राप्रमाणे विकास व्हावा म्ह्णून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवटेकडी हि शहराच्या मध्यस्थीत उंचीवर आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्ह्णून या स्थळाचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने पर्यटन स्थळ विकास निधी अंतर्गत निधी देण्याची मागणी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे. सोबतच वडाळी-बांबु गार्डन विकासासाठी सुद्धा निधी देण्यात यावा , जेणेकरून अमरावतीमध्ये दोन पर्यटन स्थळ निर्माण होतील. असे देखील आमदार महोदयांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. अमरावती शहरातील विद्युत नगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक सौंदयीकरण सुरु आहे. या दोन्ही ठिकाणांचा स्मारकाप्रमाणे विकास करायचा असून अनुयायांच्या सोयीच्या दृष्टीने चांगल्या सुविधा निर्माण करायच्या आहे. म्ह्णून या दोन्ही ठिकाणी स्मारक साकारण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे. क्रीडा विकासाच्या बाबतीत बोलतांना आमदार महोदयांनी जिल्हा क्रीडा संकुलाकरिता जिल्हा नियोजन मधून १ टक्के निधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयांचे अभिनंदन केले. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठीचा हा एक चांगला निर्णय आहे.अमरावती शहरात विभागीय क्रीडा संकुल आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनातून अमरावती विभागीय क्रीडा संकुलाकरिता सुद्धा १ टक्का निधी देण्याचा मुद्दा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अर्थसंकल्पावर बोलतांना उपस्थित केला.
शासनाच्या वर्ष २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक जनतेच्या विकासाच्या दृष्टीने अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्याचा निश्चितच अमरावतीला लाभ होणार असल्याने सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांचेसह महायुती सरकारचे आभार मानीत अभिनंदन केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान २,१०० रुपये करण्याची मागणी
महायुती सरकारने गेल्या जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या मध्ये पात्र लाभार्थी महिलेला दरमहा १५०० रुपये अनुदान देय आहे. या योजनेला घेऊन सुद्धा यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाचे अभिनंदन करतांना योजनेचे अनुदान १५०० वरून २१०० रुपये वाढविण्याची मागणी केली. तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान हे शासनाच्या वतीने सहा -सहा महिन्यांनी एकत्रिपणे लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीप्रणालीद्वारे वितरित करण्यात येते. ते अनुदान सहा महिन्यांनी न देता प्रत्येक दोन महिन्यातून एकदा देण्याची मागणी सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.