लिंगभाव संवेदनशीलता विकासात पुरुषांचा सहभाग महत्त्वपूर्ण विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे प्रतिपादन

अमरावती :- लैंगिक समानता ही महिला सक्षमीकरणाची पूर्वअट आहे. त्यासाठी समाजात लिंगभाव संवेदनशीलता विकसित होणे आवश्यक आहे. लैंगिक समानतेच्या दृष्टीने व्यक्तीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे म्हणजे लिंगभाव संवेदनशीलता होय. लिंगभाव संवेदनशीलता विकासात पुरुषांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यांनी त्यात सक्रीय सहभाग दिला पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत ‘महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता’ यविषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या समारोप सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून गृहविज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय, तिसऱ्या सत्राचे विषयतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्याच्या मागास वर्ग आयोगाचे सदस्य डॉ. अंबादास मोहिते यांसह वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे उपस्थित होत्या.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘लैंगिक समानता : संकल्पना, स्थिती आणि आव्हाने’ आणि दुसऱ्या सत्रात ‘महिला सक्षमीकरण : संकल्पना, स्थिती आणि आव्हाने’ याविषयांवर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दर्शना पवार यांनी मांडणी केली. त्या महाराष्ट्रात जेंडर ट्रेनर म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या मांडणीत लिंगभाव, पुरुषसत्ता, घरकाम, स्त्रियांविरुद्ध हिंसा, संस्कृती, समानता, महिला सक्षमीकरण, लिंगभाव संवेदनशीलता यांसारख्या संकल्पनांची सोप्या शब्दात मांडणी केली. तसेच त्यांविषयीची सद्यस्थिती मांडली. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. सहभागींशी संवाद साधत त्यांनी सहभागींच्या दृष्टीकोनातून आपल्या विषयाची मांडणी केली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात डॉ. अंबादास मोहिते यांनी ‘लैंगिक समानता : नियोजन, धोरण आणि कृतिकार्यक्रम’ याविषयावर मांडणी केली. भारतीय संविधान, समानतेचा हक्क, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाची आंतरराष्ट्रीय व भारतीय स्थितीवर दृष्टीक्षेप टाकला. लैंगिक समानतेच्या दृष्टीने व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर करावयाच्या कृतींची चर्चा सुद्धा त्यांनी केली. सोबतच ‘शिव्या मुक्त अभियाना’ची माहिती देऊन त्या संदर्भातील शपथ उपस्थितांना दिली.
डॉ. वैशाली धनविजय यांनी समारोप सत्रात प्रमुख अतिथी म्हणून मांडणी करताना स्त्रियांविरुद्ध हिंसेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शिवाय घरकाम आणि आहार यांतील लैंगिक भेदभाव व त्याचे दुष्परिणाम निदर्शनास आणून दिले. तसेच व्यक्तिगत पातळीवर लैंगिक समानतेसाठी कृतिशील होण्याबाबत उपस्थितांना आवाहन सुद्धा केले.
कार्यक्रमात काही सहभागींनी अभिप्राय व्यक्त करून कार्यशाळेची उपयोगिता व महत्त्व सांगितले. सदर कार्यशाळेतील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि समारोप सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनुक्रमे पूजा अलोने, अभिलाष धाबे व डॉ. मनीषा इंगळकर यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विविध शासकीय विभागांमधील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.