होळी निमित्त आदिवासी बांधवांसाठी मोफत जेवण आणि आरोग्य शिबिर

परतवाडा :- होळी हा आदिवासी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बाहेर राज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक बांधव या सणासाठी घरी परततात. यंदाही परतवाडा येथील रेस्ट हाऊस परिसरात मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मागील दहा वर्षांपासून वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ आणि नितेश किल्लेदार मित्र मंडळाने ही परंपरा जपली आहे. मात्र, यंदा आमदार केवलराम काळे यांनी पुढाकार घेत हा उपक्रम अधिक व्यापक केला आहे.
याठिकाणी केवळ जेवण सेवा नव्हे तर आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. खोज संस्थेच्या वतीने मार्गदर्शन स्टॉल उभारण्यात आले असून, आरोग्य शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांच्या नियोजनात मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्य सहाय्यक . गजानन सुने, डॉ. मानसी तुमरे, आरोग्य सेवक प्रवीण रमेशपंत निभोरकर, आरोग्य सेविका हिना सौदागर आणि संपूर्ण आरोग्य विभाग कार्यरत आहे.
आदिवासी बांधवांसाठी करण्यात आलेल्या या मोफत जेवण आणि आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात आहे. सामाजिक उपक्रमांसाठी योगदान देणाऱ्या संस्था आणि आमदार केवलराम काळे यांच्या पुढाकाराचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.