भटक्या कुत्र्याचा प्राणघातक हल्ला! निष्पाप मुलगा थोडक्यात बचावला
यवतमाळ :- यवतमाळच्या वणी शहरात भटक्या कुत्र्याने एका निष्पाप लहान मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे! या भयंकर घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. मात्र, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात असताना, प्रशासन कधी जागं होणार?
पाहुया हा संपूर्ण अहवाल
वणी शहरातील सदाशिव नगरमध्ये लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका! अनिल उत्तरवार यांच्या घरासमोर अंदाजे ५-६ वर्षाचा मुलगा सायकल चालवत होता. याचवेळी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याने अचानक मुलावर हल्ला केला! कुत्र्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली, आणि कसेबसे स्वतःला वाचवले.
त्याचवेळी अजून एक लहान मुलगा सायकलवरून जात असताना हा प्रसंग पाहून तिथून जीवाच्या भीतीने पळून जात असतांनाची ही संपूर्ण घटना अनिल उत्तरवार यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट कैद झाली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांच्या मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वणी शहरातील नागरिकांनी महापालिका व प्रशासनावर संताप व्यक्त करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. जर वेळीच पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात! प्रशासनाने त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा लोकांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे!
ही घटना फक्त वणीपुरती मर्यादित नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा धोका वाढत आहे. आज एक लहान मुलगा सुदैवाने वाचला, पण उद्या याच प्रकारच्या हल्ल्यामुळे कोणाचा तरी जीव गेला तर जबाबदार कोण? प्रशासनाला जाग कधी येणार? यावर उपाययोजना केव्हा होणार?