भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात भ्रष्टाचाराचा भांडाफोड!

भातकुली :- नागरिकांच्या विकासासाठी येणारा निधी नेमका जातो कुठे? गौरखेडा गावातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.अवघ्या दोन महिन्यांतच नव्याने बांधलेला सिमेंट रोड खराब झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.२० लाखांचा निधी नेमका कोणाच्या खिशात गेला?गावकऱ्यांच्या या रोषाला जाब कोण देणार?
पाहुया हा विशेष रिपोर्ट
भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात केवळ दोन महिन्यांपूर्वीच नव्याने सिमेंट रस्ता बांधण्यात आला. मात्र या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यावरचा गिट्टी पूर्णपणे बाहेर आला आहे. यामुळे या रस्त्याच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. स्थानीय ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला मोठा कंत्राट दिला, पण कामाचा दर्जा अगदी निकृष्ट! लखन लांजेवार नावाच्या ठेकेदाराने हे काम केल्याचे समोर आले आहे, मात्र यामध्ये मोठी आर्थिक अफरातफर झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
२० लाख रुपयांचा निधी कुठे गेला? हा मोठा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. ग्रामपंचायतीने देखील कोणतीच दखल घेतलेली नाही, त्यामुळे लोक यावर आक्रमक झाले आहेत. हा भ्रष्टाचार एका मोठ्या रॅकेटचा भाग तर नाही ना? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील एक मोठा दलाल आणि राजकीय व्यक्ती हे सर्व काम नियंत्रित करतो. तोच ग्रामपंचायतीतील कमिशनची सर्व कामे बघत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याचा थेट फटका गावकऱ्यांना बसत असून, पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्ता पुन्हा बांधण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरीत पावले उचलून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत!