मुंबईत होळी-धुलीवंदनाच्या दिवशी डीजे-लाऊडस्पीकरला बंदी; आदित्य ठाकरे संतापले, महायुतीला घेरले!

मुंबई: वरळीतील कोळीवाड्यांमध्ये होळी-धुलीवंदनाच्या दिवशी लाऊड स्पीकर डीजेला बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी नोटीस तर काही ठिकाणी तोंडी सूचना देऊन पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत वरळीत लाऊडस्पीकर डीजे वर होळी-धुलीवंदनाच्या दिवशी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सर्वत्र मुंबईत डीजे आणि लाऊडस्पीकवर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.
वरळी कोळीवाड्यात लाउड स्पीकर डीजे लावून न दिल्याने कोळी बांधवांच्या पारंपारिक होळीचा सणावर विरजन आल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांच्या या निर्णयावर कोळी बांधवांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सरकारला मराठी सणांविषयी एवढा आकस का?, असा सवाल वरळीचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकार मराठी सणांवर बंधन घालत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरेंचा संतप्त-
एकीकडे पीओपी गणेश मूर्ती संदर्भात गणेश मंडळांना, गणेश मूर्तीकारांना विविध नियमांमध्ये अडकवून विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. तर आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी ‘माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम लावली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप आहे. वरळीत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. कोळी बांधव आपल्या पारंपारिक पेहरावात या उत्सवात सहभागी होतात, कोळी नृत्य वर ठेका धरतात. मात्र आता याच कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू असल्याचा आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाणार-
वरळी कोळीवाड्यात लाऊड स्पीकर आणि डीजेला बंदी घातल्याने वरळीतील कोळी बांधव नाराज आहेत. जिथे जिथे लाऊड स्पीकर किंवा डीजे लावण्यात येतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे तर काही ठिकाणी तोंडी सूचना देण्यात आले आहे. मात्र काल या उत्सवा दरम्यान लाऊड स्पीकर डीजे कुठेही लावू देण्यात आला नाही. दरवर्षी रात्री दहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र यावेळी ध्वनी प्रदूषणाचे कारण लाऊड स्पीकर आणि डीजेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. जर लाऊड स्पीकर आणि डीजे चा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोबतच दिलेल्या नोटीसचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाईल असं सुद्धा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
नेमक्या काय सूचना नोटीसमध्ये करण्यात आले आहेत?
1) ध्वनिक्षेपक परवानगी पोलीसाना राहील. असली तरीही, तकार प्राप्त होताय ध्वनीक्षेपक बंद करण्याचा अधिकार असेल
2) डि.जे.साऊंडचा वापर करण्यास मनाई आहे.
3) ध्वनीप्रदषाण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये दिवसा ०६.०० वा. ते रात्री २२: ०० वा पर्यंत तसेच शासनाने विशेष वेळी कलम ५ अन्वये अभिकाराचा वापर करून दिलेल्या परवानगीच्या विहित वेळेत ध्वनीक्षेपक/लाऊडस्पीकर बंद न केल्यास आयोजकांवर ध्वनीप्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० कलम १५ अन्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
4) अर्जामध्ये नमूद केलेली ध्वनिक्षेपकाची जागा पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय बदलता येणार नाही.
5) ध्वनीप्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० कलम ८ अन्वये दिलेल्या आदेशाच्या निर्देशाचे उल्लंघन केल्यास ध्वनीक्षेपक/लाऊडस्पीकर वापराकरीता दिलेला परवाना रद्द केला जाईल.