दोन वर्षे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले, तरीही किसान सन्मान निधी मिळाला नाही, अखेर शेतकऱ्याचा मृ्त्यू

वर्धा: तब्बल दोन वर्षापासून किसान सन्मान निधीसाठी सतत पाठपुरावा करूनही अखेरपर्यत निधी मिळाला नाही. आर्वीच्या उमरी गावातील 94 वर्षीय शेतकरी बाबूलाल सिताराम आत्राम या शेतकऱ्याने कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केलाय. आमदारांनी संबंधित कार्यालयांना पत्र देखील दिले पण सन्मान निधी न मिळालेल्या बाबूलाल यांचा अखेर मृत्यू झालाय. सन्मानाशिवाय मरण आलेल्या या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकरी आहेत. जे अजूनही किसान सन्मान निधीची प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे किसान सन्मान निधीकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी होते आहे.
बाबूलाल हे दोन वर्षापासून घरच्या सदस्यांना घेऊन शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजवत राहिले. तहसील कार्यालयात गेल्यावर बँकेत खात्याशी आधार संलग्न व ईकेवायसी करा असे सांगण्यात आले, हे सर्व केल्यावर तहसील विभागाकडून कृषी कार्यालयाकडे बोट दाखवण्यात आले. माजी आमदार दादाराव केचे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनासुद्धा याविषयी पत्र पाठवले परंतु कार्यवाही झालीच नाही. अखेरपर्यत बाबूलाल यांना किसान सन्माननिधीच मिळाला नाही. काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक व शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी बाबुलाल यांच्या घरी भेट दिली. किसान सन्मान निधीचा गाजावाजा करण्यात आला परंतु या शेतकऱ्याने अनेकदा शासनाचे उंबरटे झिजवले परंतु शेतकऱ्यांचा सन्मान झाला नाही अशी प्रतिक्रिया किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी दिली.
शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण करावं
अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणीकृत आहेत, परंतु तरीही लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की ई-केवायसी झाली नाही, लाभार्थी शेतकऱ्याच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही किंवा अर्ज करताना शेतकऱ्याने काही चूक केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण करण्यास सांगितले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.