LIVE STREAM

Accident NewsLatest News

‘मी दारु प्यायलो नव्हतो, कार ताशी 50 किमी वेगात होती,’ 5 जणांना उडवणाऱ्या तरुणाचा दावा, म्हणतो ‘मी ड्रग्ज…’

 गुजरातच्या वडोदरा येथे 5 जणांना भरधाव कारने उडवलं आहे. यामधील एका महिलेचा मृत्यू झाला असून, इतर जण गंभीर जखमी झाले आहेत. 20 वर्षीय तरुण ही कार चालवत होता. दरम्यान आपण मद्यपान केलं नव्हतं असा दावा तरुणाने केला आहे. तसंच इमर्जन्सी एअरबॅगमुळे आपण नीट पाहू शकलो नाही असंही त्याचं म्हणणं आहे. आपण वेगात कार चालवत असल्याचा दावाही त्याने फेटाळून लावला आहे. 
 रक्षित चौरसिया असं या तरुणाचं नाव असून, त्याने शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "मी गाडी चालवत असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या चौकाजवळ एक खड्डा आहे. त्यामुळे मी खड्डा चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. पण खड्ड्यामुळे माझी गाडी समोरून चालणाऱ्या स्कूटरला धडकली. त्यावेळी आपत्कालीन एअरबॅग बाहेर आली, ज्यामुळे मी समोरचं पाहू शकलो नाही आणि धडक झाली".
 वडोदरा शहराच्या करेलीबाग येथे वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, काळ्या रंगाची कार भरधाव वेगात धावत होती. या कारने दोन दुचाकींना धडक दिली. तसंच तिथे उभ्या काही नागरिकांनाही उडवलं. धडक इतकी जोरदार होती की, एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक मद्यावस्थेत आपल्या कारमधून बाहेर आला. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, चालकाने काळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं असून त्याला अजिबात शुद्ध नव्हती आणि आरडाओरड करत होता. तो वारंवार, 'आणखी एक राऊंड हवा आहे का?', 'ओम नम; शिवाय' असं ओरडत होता. 
    रक्षित चौरसियाने दावा केला आहे की, "कारचा वेग फक्त ताशी 50 किमी होता. मला माझ्यासमोर फक्त स्कूटर आणि कार दिसत होती. मला रस्त्याच्या शेजारी चालणारे लोक दिसलेच नाहीत". अपघाताच्या रात्री पार्टी किंवा मद्यपान केलं होतं का? असं विचारण्यात आलं असता विद्यार्थ्याने आपण मद्याच्या प्रभावाखाली नसून होळी साजरी केल्यानंतर घऱी परतत होतो असा दावा केला आहे. "मा ना दारु प्यायला होतो, ना ड्रग्ज घेतले होते," असं त्याने म्हटलं आहे. 
गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजता करेलीबाग परिसरात हा अपघात झाला. त्यानंतर रक्षित चौरसियाला अटक करण्यात आली. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे आणि वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी, जो कारचा मालक आहे आणि अपघाताच्या वेळी चौरसियासोबत प्रवास करत होता, त्यालाही अटक करण्यात आली. त्याचे नाव मित चौहान असे आहे, जो वडोदरा येथे राहतो आणि एका खासगी विद्यापीठात विद्यार्थी आहे.
   मिळालेल्या माहितीनुसार, चौरसिया ताशी 120 किमी वेगाने कार चालवत होता. व्हिडिओत दिसत आहे त्यानुसार, त्याने दोन स्कूटर्सना धडक देत त्यांना खाली पाडलं आणि फरफटत नेलं. त्याने गाडीने चार जणांना धडक दिली, ज्यात त्यावेळी तिच्या स्कूटरवरून जाणाऱ्या एका महिलेचा समावेश होता. हेमानी पटेल अशी या महिलेची ओळख पटली आहे, ती तिच्या अल्पवयीन मुलीसोबत होळीचे रंग खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
    अपघातस्थळावरून रक्षित चौरसियाला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तो खरोखरच मद्यधुंद अवस्थेत होता आणि वेगाने गाडी चालवत होता. "कार वेगाने जात होती आणि करेलीबाग परिसरात अनेक लोकांना धडकली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर चार जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. आम्ही एफआयआर दाखल करू आणि या मद्यपान करून गाडी चालवल्याच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहोत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे," असं वरिष्ठ पोलिस अधिकारी पन्ना मोमाया यांनी सांगितलं आहे. 
  घटनेच्या काही तासांनंतर अटक करण्यात आलेल्या चौहानची वैद्यकीय चाचणी करण्यात आली जेणेकरून तोही मद्यधुंद होता की नाही हे पोलिसांना कळू शकेल. त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!