संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये तळीरामांनी लावली मोठी आग; सुमारे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबईच्या बोरिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये तळीरामाने मोठी आग लावल्याची घटना घडली आहे. होळीनिमित्त मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलालगत असलेला दहिसर परिसरात गेले होते. यावेळी संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये अचानक मोठे आगीचे लोट दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार ही आग तिथल्या तळीरामाकडून लावण्यात आली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार ते पाच गाड्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधले सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 1 ते दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे. तर ही आग कोणी लावली? या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सुरक्षारक्षक आणि पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वनवा लागण्याची घटना ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रावलपाडा नियत क्षेत्रातील सर्वे नं. 345ब मधील असून संध्याकाळी 7 च्या सुमारास लागलेली आग ही ८ वाजता कु. उ. बो. वनक्षेत्र अधिकरी, वन कर्मचारी आणि Rapid Response Team च्या प्रयत्नाने पूर्णपणे विझवण्यात आली.
81 वाहन चालक तळीरामांवर कारवाई
ठाणे पोलिस आयुक्तालयात ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवड निमित्त ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकूण 81 वाहन चालक तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दंड वसूल देखील करण्यात आला आहे. धुळवड सणानिमित्त कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम आखण्यात आली होती. या कारवाईमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी तिघांचा बुडून मृत्यू, देहूतील दुर्दैवी घटना
पुण्यातील देहूत धुलीवंदनाच्या दिवशी बुडून तिघांचा मृत्यू झालाय. इंद्रायणी नदीवर ही दुर्दैवी घटना घडली. घरकुल परिसरातील 10 ते 12 तरुण पोहण्यासाठी दुपारी देहूत गेले होते. चार वाजताच्या दरम्यान हे सगळे मित्र पाण्यात उतरले. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास काहीजण पाण्याच्या मधोमध गेले, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं काहीजण बुडाले. एकाला स्थानिकांनी वाचवले. पण तिघांचा यात जीव गेलाय. मावळच्या वन्यजीव रक्षक पथकाने बचावकार्यात मदत केली. देहूतील या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.