पुण्यात एका रात्रीत तीन भीषण अपघात

पुणे :- पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात २ जणांच मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन आणि फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तीन अपघात घडल्याची महिती आहे.
दोन अपघातात दोघांचा मृत्यू, पुण्यात खळबळ
यामध्ये पहिल्या अपघातात ३४ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या एका अपघातात ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनांने पुण्यात एकच खळबळ माजली आहे.
वृद्ध महिलेला कारची जोरदार धडक
पहिला अपघात हा पुण्यातील सासवड रोडवर उरळी देवाची या परिसरात घडला घडल्याची माहिती आहे. या अपघातात सिंधुबाई क्षीरसागर या वृद्ध महिलेच्या जागीच मृत्यू झाला आहे. चार चाकी वाहन पाठीमागे घेत असताना या वाहनाची वृद्ध महिलेला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती यामध्ये वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील कार चालक मनोज अहिरे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
काळेपडळ परिसरातील फूड डिलिव्हरी बॉयला उडवलं
तर दुसऱ्या अपघातात पुण्यातील काळेपडळ परिसरातील फूड डिलिव्हरी बॉयला एका अज्ञात चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धडक किती भीषण होती हे त्या कारचे फोटो बघून लक्षात येते. या कारने डिलिव्हरी बॉयच्या गाडीला इतक्या जोरदार धडक दिली की त्या कारच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला मजहर जिलानी शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाचा तपास सुरू आहे. तर, तिसऱ्या हडपसर परिसरात जेएसपीएम कॉलेजच्या समोर देखील एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात देखील एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.