बीडच्या आष्टीत ट्रकमालकाच्या क्रूरतेचा धक्कादायक प्रकार: चालकाला दोन दिवस डांबून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू

बीड :- बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकरण पुढे आलंय. बीडच्या आष्टी तालुक्यात ट्रकमालकाकडून चालकाला डांबून ठेवण्यात आले आणि इतकी जास्त मारहाण करण्यात आली की, त्याचा या मारहाणीत मृत्यू झालाय. हैराण करणारे म्हणजे त्या ट्रकचालकाचे संपूर्ण अंग काळे निळे पडले असून त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आलीये. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एकाला ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळतंय.
बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रकमालकाने चालकाला तब्बल दोन दिवस डांबून ठेवले आणि त्याला सतत मारहाण केली. मारहाणीत चालकाचा मृत्यू झाला. विकास बनसोडे राहणार जालना हा पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर नावाच्या व्यक्तीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. विकास आणि क्षीरसागर यांच्यात वाद झाला. या वादानंतर क्षीरसागर यांनी चालकाला डांबून ठेवत मारहाण केली, असा आरोप विकासचा भाऊ आकाश याने केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणात एकाला ताब्यात देखील घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास केला जातोय. या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचे पोलिसांकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय. चालकाला किती जास्त क्रूरपणे मारहाण करण्यात आलीये, हे व्हायरल होणाऱ्या फोटोंवरून स्पष्ट दिसतंय. बीडमधील मारहाणीचे व्हिडीओ एका मागून एक पुढे येताना दिसत आहेत. त्यामध्येच आता हा धक्कादायक प्रकार पुढे आलाय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सकाळी याप्रकरणावर भाष्य केले. विकास बनसोडे याच्या भावाने काही गंभीर आरोप केली आहेत. सातत्याने बीडमधील अशाप्रकारच्या घटना पुढे येताना दिसत आहेत. धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्याही मारहाणीचे धक्कादायक दोन व्हिडीओ पुढे आली. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दादा खिंडकर यांना अटक केली आणि न्यायालयात हजर केले. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आली.