लातूरमध्ये सलग दोन खूनाच्या घटना; पोलीस स्टेशनच्या गेटवर आणि पाणीपुरी विक्रेत्यावर हल्ला, नागरिकांमध्ये भीती

लातूर :- लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. एकापाठोपाठ खुनाचा घटना घडल्या असून या घटनांमुळे लातूर जिल्हा हादरला आहे. मागच्या दोन दिवसात सलग दोन खुनाच्या घटना घडल्या असून यात एका घटनेत पोलीस स्टेशनच्या गेटवरच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे लातूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लातूरमध्ये मागील काही दिवसात धक्कादायक घटना घडल्या आहेत. यात दोन- तीन दिवसांपूर्वीच भर रस्त्यात दोन गट आमने सामने आले होते. याठिकाणी भर रस्त्यात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यानंतर मागील दोन दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्या आहे. या सर्व प्रकारांमुळे लातूर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील नागरिक सुरक्षित नसल्याचे अनुभव शहरवासीयांना येत आहे.
पोलीस स्टेशनच्या गेटवरच हत्या
दरम्यान पहिल्या एका घटनेत लातूर शहरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गेटवरच खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना १५ मार्चला घडली आहे. पोलीस स्थानकासमोरच घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास केला जात आहे.
पाणीपुरी विक्रेत्यावर शस्त्राने वार
दरम्यान सदरची घटना ताजी असताना शहरात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बार्शी रोडवर एका परराज्यातील पाणीपुरी विक्रेत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.