LIVE STREAM

Accident NewsCrime NewsLatest News

सांगलीत हिट अँड रनचा थरार; भरधाव कारने ८-१० दुचाकींना धडक दिली, तीन गंभीर जखमी

सांगली :- सांगली-खोतवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हिट ॲण्ड रनची थरारक घटना घडली. बेदरकार वाहनचालकाने रस्त्यावरील आठ ते दहा दुचाकींना उडवले. माधवनगर आणि बुधगावच्या नागरिकांसह वाहनधारकांनी त्या गाडीचा पाठलाग केला. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुचाकीसह चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेतली. तोपर्यंत हजारहून अधिक जणांचा जमाव चालकाला चोप देण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी जमावाला बाजूला करून चालकाला ताब्यात घेतले. नितेश पाटील असे चालकाचे नाव असून तो आटपाडी तालुक्यातील असल्याचे समजते. चालकासह गाडीतील महिलाही जखमी झाली आहे.

नेमकं काय घडलं?

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पाटील हा आटपाडी तालुक्यातील एका गावातील असल्याचे सांगितले जात आहे. तो आलिशान कार घेऊन माधवनगर ते बुधगाव या मार्गावर रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास निघाला होता. सुरुवातीला त्याने वसंतदादा कारखान्यासमोर एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्यावर आडव्या येणाऱ्या आठ ते नऊ वाहनांना त्याने जोराची धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बुधगाव येथे एका मोटारसायकलस्वाराला त्याने फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. नागरिक पाठलाग करत असल्याचे पाहून त्याने भरधाव वेगात गाडी खोतवाडीकडे नेली. यावेळी त्याने खोतवाडी गावाच्या स्वागत कमानीला गाडी धडकवल्याने ती थेट शेतात जाऊन आदळली. माधवनगर आणि बुधगावच्या गावकऱ्यांनी कारचा पाठलाग करून चालकाला पकडले. गाडीतील चालक व महिला दोघेही जखमी झाले.

घटनास्थळी हजार ते दीड हजाराचा जमाव

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हजार ते दीड हजाराचा जमाव जमा झाला होता. पाटील याने गाडीचा दरवाजा उघडला नाही, त्यामुळे संतप्त जमावाने त्याच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला बाजूला करीत चालकाला ताब्यात घेतले. चालक पाटील हा गलाई व्यवसायिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींपैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस उपअधीक्षक विमला एम यांनी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!