अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकेवर चाकू हल्ला

अमरावती :- मोठी बातमी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून येत आहे. एका रुग्ण महिलेने कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेवर थेट चाकू हल्ला केला. या हल्ल्यात परिचारिका गंभीर जखमी झाली असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमका काय आहे संपूर्ण प्रकार?
पाहूया आमचा हा सविस्तर रिपोर्ट :
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. वॉर्ड क्रमांक २ मध्ये कर्तव्यावर असलेल्या परिचारिका लता शिरसाठ यांच्यावर एका रुग्ण महिलेने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात परिचारिकेचा नाक व जबडा फाटला असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
परिचारिकेने आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हल्ला झाला तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. उपस्थित रुग्ण व नातेवाईकांसमोर हा प्रकार घडला.
या घटनेची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. मात्र, परिचारिकेचा आरोप आहे की, “वाद झाल्यानंतर पोलिसांना माहिती दिली होती, पण पोलीस उपस्थित असूनही काहीच कारवाई केली नाही.
हल्ल्यानंतर ही महिला रुग्णालयातून पसार झाली होती. मात्र, पोलिसांनी तिला अटक करून यवतमाळ महिला सुधारगृहात दाखल केले आहे. आता पोलीस या महिलेने चाकू रुग्णालयात कसा आणला? आणि हल्ल्याचे नेमके कारण काय? याचा तपास करत आहेत.
रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकेवरच अशा प्रकारे हल्ला होणे धक्कादायक आहे. हा हल्ला नेमका कशामुळे झाला? पोलिसांची कारवाई कितपत ठोस असेल? याकडे आता सर्वांचे लक्ष राहील. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News.