आलेगाव येथील पडक्या बस निवाऱ्याचा पत्रकार व ग्रामस्थांकडून निषेध

अकोला, पातूर :- पातूर तालुक्यातील आलेगाव येथे प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था पाहता स्थानिक पत्रकार आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या उदासीनतेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. तुटलेल्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या या बस निवाऱ्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि पत्रकारांनी या निवाऱ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
पाहूया सविस्तर हा रिपोर्ट :
आलेगाव हे पातूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्दळ असते. मात्र, बसस्थानकावरील प्रवासी निवारा गेल्या चार-पाच वर्षांपासून अत्यंत दयनीय स्थितीत आहे. छताचे पत्रे तुटलेले असून कधीही प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत पत्रकारांनी अनेक वेळा वृत्तांकन केले, मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. उन्हाळ्यात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानीय पत्रकार आणि ग्रामस्थांनी याचा तीव्र निषेध नोंदवला असून, १७ तारखेला निवाऱ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासनाने तत्काळ पावले उचलून बस निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आलेगावातील प्रवासी निवाऱ्याची स्थिती गंभीर असून, प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिक आणि पत्रकारांच्या या मागणीला प्रशासन कोणता प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.