चिटणीस पार्कजवळ पोलिसांवर दगडफेक – न्यू इंग्लिश स्कूलसमोर अज्ञातांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने तणाव.

नागपुरातील चिटणीस पार्कजवळ न्यू इंग्लिश स्कूलसमोर काही अज्ञात व्यक्तींनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने अश्रूगॅस सोडला असून, मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
औरंगजेब प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर विविध संघटनांकडून निवेदने दिली जात आहेत. नागपुरातील दर्ग्यासमोरील चादर अर्पण करण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव वाढला असून, नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
नागपूरच्या महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे वातावरण आणखी तणावग्रस्त झाले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
गडकरी म्हणाले की, “नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी प्रसिद्ध शहर आहे. येथे जात, पंथ आणि धर्मावरून वाद होऊ नयेत. प्रशासन परिस्थितीवर कार्यवाही करेल, त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा.
“नागपूर पोलिसांकडून शहरभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.