यवतमाळ जिल्ह्यात १० नवीन सुसज्ज एसटी बसेस दाखल!

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या १० एसटी बसेस दाखल झाल्या असून, यवतमाळ व उमरखेड आगाराला प्रत्येकी ५ बसेस देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ बसस्थानकावर या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण ९० नवीन बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात १० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या आणि अपुऱ्या बसेसमुळे प्रवास करताना येणाऱ्या अडचणींवर यामुळे काही प्रमाणात तोडगा निघेल.
यवतमाळ जिल्ह्यात अजून ८० बसेस लवकरच दाखल होणार असून, त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. एसटी बससेवा ही ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि नवीन बसेस आल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल.