शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ :- यवतमाळ जिल्हा म्हणजे शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा… मात्र आता ही परिस्थिती बदलणार का? नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार आहेत. सिंचन, कृषी आणि मत्स व्यवसायाला गती देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. काय आहेत त्यांच्या योजना?
पाहुयात हा खास रिपोर्ट :
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. सततच्या नापिकी, कर्जाचा बोजा आणि नैराश्यामुळे अनेक शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. मात्र, आता नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे जाहीर केले आहे. जय महाराष्ट्रशी बोलताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष दिले जाणार असून, सिंचन, पशुपालन आणि मत्स्य व्यवसायाला चालना दिली जाणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त भागांसाठी खास योजना आणल्या जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रासाठी गंभीर विषय आहे, आणि यवतमाळ जिल्हा त्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या नव्या योजनांमुळे हा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. पुढील काही महिने या उपाययोजना किती प्रभावी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.