होळीच्या दिवशी युवकांचा धिंगाणा – पार्किंगमध्ये चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या!

नागपूर :- नागपूर शहरात होळीच्या दिवशी धिंगाणा घालणाऱ्या काही युवकांनी मोठा गोंधळ घातला आहे. वेगाने वाहन चालवणाऱ्या काही युवकांना हटकले असता त्यांनी स्थानिक रहिवाशांशी वाद घातला आणि नंतर रात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ५ युवक आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
होळीच्या दिवशी म्हणजेच १२ मार्च रोजी बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन युवक मोठ्या वेगाने वाहन चालवत होते. नागरिकांनी त्यांना हटकले असता त्यांनी वाद घातला आणि घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, काही तासांनी ते आपल्या मित्रांसह परत आले आणि परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्वरीत तपास करून ५ युवक आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, १८ वर्षांखालील मुलांना वाहने चालवू देऊ नयेत आणि वाहने अतिवेगाने चालवू नयेत. अन्यथा अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर, नागपूर शहरात होळीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत संबंधित युवकांना ताब्यात घेतले आहे. १८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवू नये आणि अतिवेगाने वाहन चालवण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.