३१ मार्चला बेलोरा विमानतळ सुरू होणार? अद्याप संभ्रम कायम!

अमरावती :- अमरावती शहरासाठी एक मोठी खुशखबर! ३१ मार्चपासून बेलोरा विमानतळ सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्ष उड्डाणे होणार की नाही, यावर अद्याप संभ्रम कायम आहे. आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या आढाव्यात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत.
पाहुया ही विशेष बातमी :
अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची मोठी प्रतीक्षा संपली, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामाला युद्धपातळीवर गती देण्यात आली. या विमानतळामुळे स्थानिक उद्योजक, विद्यार्थी, आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावती शहर आणि विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने हा मोठा टप्पा ठरणार आहे.
मात्र, प्रत्यक्ष पाहणी करताना आमच्या प्रतिनिधींना मोठा अडथळा आला. बेलोरा विमानतळावर आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला. महाराष्ट्र सुरक्षा गार्डने स्पष्ट सांगितले की, वरिष्ठांकडून मीडियाला आत जाण्याची परवानगी नाही. अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक देण्यासही नकार देण्यात आला. यामुळे प्रत्यक्ष विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे का? धावपट्टी आणि प्रवासी सुविधांचे अंतिम काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे का? याबाबत अधिकृत खुलासा प्रशासनाकडून अपेक्षित आहे. नागरिक मात्र उत्सुकतेने प्रतिक्षेत आहेत.
३१ मार्चपासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल का, याबाबत निश्चितता नाही. प्रशासनाने अधिकृत माहिती द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पुढील काही दिवसांतच या संदर्भात स्पष्टता येईल. या विषयावर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा city news.