अमरावतीत ट्रक थेट नाल्यात! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भीषण अपघात

अमरावती :- अमरावतीतील पन्नालाल बगीचा परिसरात मोठा अपघात! मालवाहू ट्रक थेट २५ फूट खोल नाल्यात कोसळला! चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. पण या अपघातामागील खरी कारणं काय आहेत? काहीच महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याच्या पायाखालची जमीन पोकळ का झाली? सिटी न्यूजच्या वारंवार वृत्तांकनानंतरही प्रशासन का झोपले होते?
सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया सविस्तर रिपोर्टमध्ये :
१७ मार्च रोजी अमरावतीतील पन्नालाल बगीचा जवळील मोठ्या नाल्यात मालवाहू ट्रक कोसळून चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना काही अचानक झालेली नाही. पायवाट रस्त्याच्या खालील भाग पोकळ झाल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
विशेष म्हणजे, काहीच महिन्यांपूर्वी इथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र रस्त्याच्या आतील भाग संपूर्ण भुसभुशीत राहिला. इतकंच नव्हे, तर अनेक वर्षांपासून या पोकळ जागेत डुकरांनी आपलं वास्तव्य केलं होतं. डुकरांनी रस्ता आतून कोरल्याने तो पूर्णपणे कमकुवत झाला होता.
सिटी न्यूजने वारंवार या धोक्याची बातमी दाखवली. नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र मनपा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं. अखेर, या निष्काळजीपणाचा फटका एका ट्रक चालकाला बसला.
अपघातानंतर सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतिया यांनी थेट मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर १८ मार्च रोजी आयुक्तांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी स्पष्ट केलं की आगामी काही दिवसांत पन्नालाल बगीचा जवळील नाल्याच्या भिंतीचे मजबुतीकरण आमदार सुलभा खोडके यांच्या निधीतून करण्यात येईल.
या दुर्घटनेनंतर अखेर प्रशासन जागं झालं आहे. पण प्रश्न हा आहे की, एक अपघात घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दुर्लक्षाला जबाबदार कोण? तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला कळवा कॉमेंटमध्ये! पुढील अपडेटसाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका!