नांदेडमध्ये शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग – आयुर्वेदिक वन औषधी शेतीतून लाखोंचं उत्पन्न

नांदेड :- शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, याचं उदाहरण नांदेडमधील एका शेतकऱ्याने साकारून दाखवलं आहे. मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील बालाजी महादवाड यांनी आयुर्वेदिक वन औषधी पिकांची लागवड करत कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
पाहुयात हा यशस्वी प्रयोग :
नांदेड जिल्ह्यातील डोंगरगावच्या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला बगल देत आयुर्वेदिक वन औषधी शेतीचा मार्ग स्वीकारला. अमेरिकन चिया, अश्वगंधा, इटालियन तुळस, कलुंजी, ईसम गोल आणि अजवाइन या सहा प्रकारच्या वन औषधी पिकांची त्यांनी अकरा एकर शेतात लागवड केली.
या पिकांच्या लागवडीसाठी केवळ 30 हजार रुपयांचा खर्च आला. आता पीक काढणीसाठी तयार असून, 25 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. शेतकऱ्याने सांगितल्यानुसार या शेतीत फवारणी, खतं, निंदण आणि खुरपणीचा खर्च तुलनेने खूपच कमी आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारीही या शेतीला भेट देत आहेत. कमी खर्चात जास्त नफा मिळवणाऱ्या या शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. शेतीत नवनवीन प्रयोग हेच शाश्वत शेतीचा आधार आहे. नांदेडच्या बालाजी महादवाड यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.