LIVE STREAM

Crime NewsLatest NewsNagpur

नागपुरात नेमकं काय घडलं?

नागपूर :- नागपूर शहराच्या महाल परिसरात दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर दगडफेकीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी दुपारी काही संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी किरकोळ वाद झाला. मात्र संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने जमलेल्या एका गटाने घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर तणाव अधिक वाढला. तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना विभक्त केले आणि जमावाला मागे हटवले. मात्र, त्यानंतर भालदारपुरा भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली. पोलिसांवरही दगड भिरकावले गेले, ज्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली. पोलिसांनी तातडीने आक्रमक भूमिका घेत अश्रुधूराच्या नळकांड्या वापरल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बलप्रयोग केला. या हिंसाचारात काही वाहनांचे नुकसान झाले असून, एका कारला आगही लावण्यात आली.

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन सातत्याने वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी काही भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात होती. या दरम्यान औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी या मागणीसाठी राज्यभरात आज ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नागपुरातही औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचा सहभाग होता.

या आंदोलनानंतर संध्याकाळी सात वाजता जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली. परिणामी दोन्ही बाजूने घोषणाबाजीला सुरुवात झाली. त्यामुळे नागपूरच्या महाल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तणाव पाहता पोलिसांनी परस्थिती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. पण रात्री 9 वाजेनंतर परिस्थिती जास्त चिघळली.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले असता जमावाकडून पोलिसांच्या दिशेला जोरदार दगडफेक करायाल सुरुवात झाली. यावेळी रस्त्यावरील अनेक वाहनं जाळण्यात आली. त्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एका गटाला पांगवलं. पण दुसऱ्या गटाकडून जोरदार दगडफेक केली जात होती. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.

पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली. यासोबत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान गेले तेव्हा त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये ते जखमी झाले. यावेळी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. घटनास्थळी वेगवेगळ्या गल्ल्यांमधून दगडफेक केली जात होती. पोलिसांनी त्या गल्ल्यांमध्ये घुसून संशयितांना ताब्यात घेतलं. यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी आहेत. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. संशयितांना ताब्यात घेतलं जात आहे.

दगडफेक करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेण्यात आले

या हिंसाचारात सहभागी असलेल्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या नागपुरात तणाव पूर्णपणे नियंत्रणात असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, “नागपूर नेहमीच शांततेचे आणि बंधुत्वाचे प्रतीक राहिले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूरकरांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागपूर शांततेसाठी ओळखले जाते. येथे जात, धर्म यांच्या आधारे वाद होत नाहीत. प्रशासन योग्य ती कारवाई करेल, त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी सहकार्य करावे,” असे गडकरी म्हणाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!