नागपुरात हिंसक वाद! राडा, जाळपोळ, हाणामारी व दगडफेक; DCP वर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी

नागपूर :- नागपूरमध्ये दोन गट आमने-सामने आल्याची घटना घडली. दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी एकमेकांवर तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महाल परिसरात ही घटना घडली. जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील जमावाने दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा देखील समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये तुफान राडा झाला. सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गट भिडले. तुफान दगडफेक, जाळपोळ त्याचसोबत वाहनांची तोडफोड करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास गेलेल्या पोलिसांनाच जमावाने लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला केला. दगडफेकीमध्ये २५ पेक्षा अधिक पोलिस जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. डीसीपी निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राडा करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत ४७ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेवून असून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, कुणी समाजात तणाव निर्माण करत असेल, पोलिसांवर दगडफेक करत असेल, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर हिंसाचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंसाचाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत ५० संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस या हिंसाचाराच्या मुख्यसूत्रधाराचा शोध घेत आहेत. नागपूरमध्ये सध्या ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी देखील नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसंच, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन देखील पोलिस प्रशासनाने केले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.