LIVE STREAM

Crime NewsLatest NewsNagpur

नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना : दोन गटांमध्ये संघर्ष, १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू ; ८० जणांची अटक

नागपूर :- औरंगजेबच्या कबरीवरून वाद उफाळल्यानंतर नागपुरात हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. महाल परिसरासोबतच हंसापुरी भागातही हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बुरखाधारी गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड करत त्यांना पेटवून दिले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने कर्फ्यू लागू केला आहे.

नकाबपोश गुंडांकडून हल्ले, वाहनं पेटवली

प्रत्यक्षदर्शींच्या मते, मोठ्या संख्येने आलेल्या हिंसक जमावाने महाल परिसरात तोडफोड आणि दंगल घडवून आणली. स्थानिक रहिवाशांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. काही दुकानांवर तलवारींनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर हिंसाचार हंसपुरीपर्यंत पसरला, जिथे गुंडांनी वाहनांना लक्ष्य केले आणि त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी केले. हंसापुरीतील एका रहिवाशाने सांगितले, “अचानक एका टोळक्याने प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क किंवा दुपट्टे होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे आणि काठ्या होत्या. त्यांनी दुकानांवर आणि घरांवर हल्ले चढवले. गाड्यांमध्ये तोडफोड करून त्यांना पेटवून दिले.”

शहरातील १० संवेदनशील भागांत संचारबंदी

हिंसेनंतर नागपूर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कलम १४४ लागू (Curfew In Nagpur) केले आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक जमावावर बंदी घालण्यात आली आहे. महाल परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिल नगर या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आला आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले की, ” संचारबंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. तसेच हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.” याशिवाय, सायबर पोलिसांनी जवळपास १८०० सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी केली आहे. हिंसा भडकवणारा आक्षेपार्ह मजकूर आणि ५५ व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर आहेत. यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना खोटी माहिती आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले असून, शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले आहे.

८० जणांना अटक

हिंसाचारानंतर पोलीस सतत त्यामध्ये सहभागी लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याच्या कामात व्यस्त आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने हिंसाचारात सामील असलेल्या लोकांना पकडले जात आहे. आतापर्यंत नागपूर पोलिसांनी ८० जणांना अटक केली आहे आणि इतरांना पकडण्याचे काम सुरूच आहे. हिंसाचारानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला होता. घरातून शोधून काढून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!