प्रत्येकाने सजग राहून ग्राहक चळवळ सशक्त करावी – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती :- प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे. त्यामुळे खरेदी करताना उत्पादनांबाबत चुकीची माहिती देत असल्यास ग्राहकांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करावा. प्रत्येक नागरिकांने याबाबत सजग राहून ग्राहक चळवळ सशक्त करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
पुरवठा विभागातर्फे आज बचत भवनात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विवेक जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार प्रज्ज्वल पाथरे, विधी अधिकारी श्री. बोहरा, अन्न धान्य वितरण अधिकारी श्री. राऊत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री अजय गाडे, अशोक हांडे, चारूदत्त चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, ग्राहकांना सशक्त करण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना भ्रमित करणाऱ्या आणि गैरसमज पसरविणाऱ्या बाबींना आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहकांना तक्रार करण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी विविध स्तरावर यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांचा अधिकारीचा उपयोग केल्यास निश्चितच भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनांना आळा घालणे शक्य होईल.
आज सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढत आहे. यात प्रामुख्याने पैशाशी संबंधित गैरव्यवहार होत आहे. याबाबत स्थानिक स्तरावर नियंत्रण करणे शक्य नाही, मात्र नागरिकांनी काही पथ्ये पाळल्यास सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहू शकणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहून आपल्या परिसरात काय घडत आहे, याची जाणिव ठेवावी. शासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहे, मात्र प्रत्येक नागरिकाने लक्ष ठेवल्यास फसवणुकीच्या प्रकारापासून दूर राहण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
श्री. जाधव यांनी चळवळीनंतर 1986 मध्ये ग्राहक हिताचा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याची जागृती झाल्यास चळवळ यशस्वी होणार आहे. ग्राहकांना कायद्याचे संरक्षण प्राप्त होण्यासाठी वस्तूंच्या खरेदी पावती जपून वापरावी. वस्तूंमध्ये काही दोष आढळल्यास याच पावतीच्या आधारे ग्राहकांना मिळणारे संरक्षण प्राप्त होऊ शकेल. ई-कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करण्याची पद्धत रूढ होत आहे. यात प्रामुख्याने परदेशी मालाची विक्री होताना दिसून येते. त्यामुळे दुसऱ्या देशाचे आर्थिक मांडलिकत्व पत्करावे लागत असल्याने अशा खरेदीपासून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी अजय गाडे, चारूदत्त चौधरी, अशोक हांडे यांनी ग्राहकांना असलेल्या हक्काबाबत माहिती दिली. शिवम पथनाट्यच्या चमूने ग्राहक जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले.