अमरावतीच्या विकासासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनात मांडले प्रस्ताव; पाणी पुरवठा, सुरक्षा आणि उद्योग विकासावर भर
मुंबई :- राज्य विधीमंडळाच्या मार्च -२०२५ च्या अधिवेशनात वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पिय अनुदानावर चर्चा करतांना अमरावतीच्या आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती मधील पाणी पुरवठा व स्वच्छता , उद्योग विकास , पर्यटन, शहर सुरक्षा , अशा विविध मुद्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अमरावती शहराला आगामी पन्नास वर्षापर्यंत पाणी पुरवठा करणारी अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ९८५.२६ कोटींची योजना मंजूर होऊन वर्ष झाले असतांना निधी उपलब्ध झाला नसल्याने याकरिता निधी देण्याची मागणी आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातुन केली आहे.
केंद्र पुरस्कृत अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योज़ना ९८५.२६ कोटीची योजना हि मागील वर्षी मंजूर करून आणली. मात्र एक वर्ष उलटून सुद्धा योजनेच्या कामांना सुरुवात झाली नाही. अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणात पाणी आहे. मात्र शहराला एकदिवस आड पाणी पुरवठ्याची झळ सहन करावी लागत असल्याने स्थानिक नागरिकांत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भावना निर्माण झाली आहे.
अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाई पर्यंतची डब्लूटीपी पाईप लाईन जुनी लोखंडी असून सद्यस्थितीत ती शिकस्त झाली असून गुरुत्व वाहिनीचे ३० वर्षाचे आयुष्यमान सन २०२४ मध्ये संपुष्ठात आले आहे. त्यामुळे नवीन मृदू पोलादी जलवाहिनी अंथरणेचे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे या संदर्भात शासनाने बैठक घेऊन अडचणी दूर कराव्यात, तसेच संबंधित कंत्राटदारांना स्पष्ट ताकीद देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याबाबत आमदार महोदयांनी सभागृह दणाणून सोडले. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने भुयारी गटार योजना टप्पा -२ साठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १७०० कोटींच्या या प्रस्तावाला मंजुरी देऊन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली.
तसेच अर्थसंकल्पात वैनगंगा -नळगंगा नदीजोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प अमरावतीमधून जाणार आहे. त्यामुळे अमरावती मध्ये सिंचन, उद्योग व पाणी पुरवठा आदी करिता नदीजोड प्रकल्पाची आखणी करण्यात यावी. तसेच अमरावती मध्ये तलाव कमी असल्याने अमरावतीच्या एमआयडीसी साठी पाणी आरक्षित करण्यात यावे, जेणेकरून उद्योगांना पाणी उपलब्ध करता येईल , याकडे सुद्धा आमदार महोदयांनी अधिवेशनातून लक्ष वेधले. औद्योगिक धोरणांच्या बाबतीत बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये साकारण्यात येणाऱ्या मेगा टेक्स्टाईल पार्क लवकर सुरु करण्यासंदर्भात महत्वपूर्ण मुद्दे मांडले. केंद्र शासनाने महाराष्ट्रामधे एकमेव अमरावती येथे मेगा टेक्स्टाईल पार्क सुरु केला आहे. त्या ठिकाणी रस्ते , वीज आदी ची कामे सुरु आहे. मात्र तेथील प्लॉट चे दर अमरावती शहरातील प्लॉटच्या दरापेक्षा जास्त आहे. ते दर जर कमी केले तर अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्क मध्ये चांगल्या कंपन्या येतील व गुंतवणूक करतील. व अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क लवकर सुरु होऊन उद्योग व रोजगाराला चालना मिळेल. याबाबतचा पुनर्रोच्चार करून आमदार महोदयांनी मेगा टेक्स्टाईल पार्क मध्ये व्यापारी व उद्योगांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची निकड असल्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
वर्ष २००२५-२६ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करतांना आमदार महोदयांनी अमरावतीच्या पर्यटन विकासाला चालना देण्याबाबत अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाला विनंती केली. राज्याच्या अर्थसंकल्पात शासनाने पर्यटन विकासावर कोटयावधी निधीची तरतूद केली. मात्र अमरावती शहरी -नागरी भागात कुठलेही पर्यटन क्षेत्र नसले तरी तेथिल शिव टेकडी व वडाळी तलाव , बांबु गार्डन हि काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. वडाळी गार्डन येथे अमृत सरोवर-२ अभियान अंतर्गत २८ कोटींची योजना मंजूर असून निधी अभावी कामे रखडली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्याकरिता केंद्र शासनाचा हिस्सा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र सरकारकडे निधी साठी पाठपुरावा करण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून रेटून धरली.
तसेच शिवटेकडी हि शहराच्या मध्यस्थीत उंचीवर आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्ह्णून या स्थळाचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने पर्यटन स्थळ विकास निधी अंतर्गत निधी देण्याची मागणी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.
शहर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सक्षम करण्यावर अधिवेशनातून खल :
आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनामध्ये गृह विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा करतांना शहर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सक्षम करण्यावर अधिवेशनातून खल दिला. अमरावती शहर हे महसूल विभागाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय मंत्रीगण , अधिकाऱ्यांचे दौरे, मोर्चे आंदोलन , सभा, उत्सव -महोत्सव , रॅली आदी सार्वजनिक बाबींकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागतो. मात्र अमरावती शहर पोलिसांकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याने तेथिल पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिकाधिक भार पडत आहे. त्यामुळे शहर पोलीस विभागात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून केली. तसेच मागील अनेक अधिवेशनात शहर सुरक्षेच्या दृष्टीने सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली असून जिल्हा नियोजनातही वेळोवेळी प्रस्ताव देण्यात आले. मात्र अजूनही हा विषय मार्गी लागला नसल्याने आमदार महोदयांनी याकडे शासनाचे लक्ष वेधून निधी देण्याची मागणी केली. शहरातील पोलीस स्टेशन च्या इमारती या जुन्या झाल्या असल्याने नवीन इमारत बांधण्यात यावी, पोलीस वसाहती शिकस्त झाल्याने नवीन वसाहती बांधण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याने तो प्रस्ताव मंजूर करून निधी देण्यात यावा, तसेच गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत रहिवाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गाडगे नगर ठाण्याचे विभाजन करून दोन पोलीस ठाणे ची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातून केली आहे.