अमरावती आमदार सुलभाताई खोडके यांची सरकारकडून १० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी; कुष्ठरोग निर्मूलनासाठी तपोवन संस्थेची गरज
मुंबई :- राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दिनांक १९-३-२०२५ रोजीच्या कामकाजमध्ये तारांकित प्रश्न क्र. ३ राज्यात कुष्ठरोग निर्मूलनासाठी करावयाच्या उपयोजनासंदर्भात चर्चा करतांना अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावतीयेथील स्वर्गीय दाजी साहेब पटवर्धन यांची कर्मभूमी असलेल्या तपोवन संस्थेमध्ये कुष्ठरोग निर्मूलन, देखभाल, औषधोपचार व पुनर्वसन आदींकरिता १० कोटीचे अनुदान देण्याची शासनाकडे मागणी केली आहे.
अधिवेशनात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी सन १९५५-५६ मध्ये सुरु केली असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात कुष्ठरोगी आढळून येत आहे. त्याचे कारण असे की राज्यात कुष्ठरोगासाठी कार्यकरण्याऱ्या आनंदवन ,तपोवन तसेच इतर संस्था यांना कुष्ठरोगाची देखभाल व औषधोपचार करण्यासाठी प्रति रुग्ण देण्यात येणारे अनुदान अत्यल्प आहे. मागील १२ वर्षा पासून त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याने संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब आमदार महोदयांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वरोरा येथील आनंदवन ला भेट दिली असता कुष्ठरोग निवारणार्थ स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेला १० कोटीचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली . राज्यात कुष्ठरोग निवारणार्थ प्रयत्न होत असतांना अमरावती येथे स्व. डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटकवर्धन यांची तपोवन संस्था मागील ७६ वर्षापासून कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य करत आहे. कुष्ठरोगी बांधवांना स्वाभिमानी, स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जिद्द निर्माण करण्याचे कार्य मागील ७६ वर्षांपासून तपोवन संस्थेमध्ये सुरु आहे. केवळ पदाधिकारी व सहकारी यांच्यासेवाभावी कार्यातून तपोवन हि संस्था चालत असून कृष्ठरुग्णांसाठी हे एक आपुलकीचे घर बनले आहे. आज कुष्ठरोगबाधित रुग्ण या तपोवनात आपले आयुष्य मोठ्या आनंदाने जगत आहेत. त्यांनी शेती, बाग फुलविली असून , त्यांचे कौशल्य विकसित झाल्याने अनेक कलाकुसरीच्या वस्तू सुद्धा कुष्ठरुग्णांनी साकारल्या आहेत. कुष्ठरुग्णांना सामाजिक जीवन जगता यावे, तसेच त्यांना समाजात संरक्षण मिळणे , वैद्यकीय सुविधा, योग्य प्रशिक्षण तसेच मुक्त शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानातही भर पडावी. यासाठी त्यांचे संगोपण व पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून तपोवन संस्थेला १० कोटींचे अनुदान देण्याच्या मागणीचा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी पुनरोच्चार करीत तपोवन मधील समस्येबाबत सभागृहाला अवगत केले.
तसेच कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समिती मध्ये इतर सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी घेतले पण तपोवन संस्थेतील प्रतिनिधी समितीमध्ये घेण्यात आले नाही. त्यामुळे तपोवन च्या समस्या कोण मांडणार ? असा प्रश्न करून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी तपोवन संस्थेतील एक-दोन पदाधिकारी शासनाच्या पुनर्वसन समितीवर घेण्यात यावा, याबाबत आपण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले असून याबाबत निर्णय घेण्याची विनंती सभागृहासमक्ष केली.
यावर उत्तर देतांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील कुष्ठरोगींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी शासन चांगल्या तर्हेने काम करणार आहे. तसेच अधिवेशनानंतर आपण कुष्ठरोग संदर्भात काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेऊन त्यांच्या उणीवा व सूचना आणि त्यांना वेगवेगळ्या कामेटींवर काम करण्याच्या दृष्टीने संधी देण्याबाबत सुद्धा कामकाज करणार असल्याची माहिती मंत्री महोदयांच्या वतीने सभागृहातून देण्यात आली.