उत्तर प्रदेश : पत्नी आणि प्रियकराच्या क्रूर कटात लंडनहून आलेल्या पतीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे १५ तुकडे करून ड्रममध्ये लपवले

उत्तरप्रदेश :- नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोनं प्रियकरासोबत पतीची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ड्रममध्ये सिंमेट ओतून त्यात लपवले. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली आहे. हत्या केल्यानंतर महिला प्रियकरासोबत शिमलाला गेली. परतल्यानंतर तिनं पतीची हत्या केली असल्याचं कबूल केलं. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव सौरभ कुमार वय वर्ष २९ असे आहे. तो लंडनमध्ये एका मॉलमध्ये कामाला होता. तो २४ फेब्रुवारीला ब्रह्मपुरीतील इंदिरानगर येथील मास्टर कॉलनीत आपल्या घरी परतला. आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परतला होता. मोठ्या थाटामाटात पत्नीचा वाढदिवस साजरा केला. यानंतर ४ मार्चला पतीच्या जिवावर पत्नी उठली.
रात्रीच्या वेळेस मुस्काननं आपल्या पतीच्या जेवणात काही अंमली पदार्थ मिसळले. ज्यामुळे सौरभ काही क्षणात बेशुद्ध पडला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रियकराला मुस्कानने बोलावून घेतलं. दोघांनी मिळून सौरभच्या छातीवर चाकू भोसकून हत्या केली. नंतर धारदार शस्त्रांनी मृतदेहाचे १५ तुकडे केले. मृतदेह सापडू नये म्हणून त्यांनी शक्कल लढवली. एका ड्रममध्ये सिमेंट ओतले आणि त्यात मृतदेहाचे तुकडे लपवून ठेवले.
सौरभ आणि मुस्कानला ५ वर्षांची मुलगी आहे. त्यानंतर मुस्काननं आपल्या मुलीला आपल्या आई वडिलांच्या घरी सोडले. ४ मार्चला पतीची हत्या केल्यानंतर ५ मार्चला दोघंही शिमलाला गेले. शिमलाहून परतल्यानंतर मुस्कानच्या कुटुंबाने जावई सौरभबद्दल विचारणा केली असता, पतीची हत्या केली असल्याचं तिनं कबूल केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.