LIVE STREAM

Helth CareLatest NewsMaharashtra

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुधारणा करण्यावर भर – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई :- राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि गोरगरिबांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य इद्रिस नाईकवाडी यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ अधिकाधिक मिळावा यासाठी शासनामार्फत सुधारणा केल्या जातील. जसे, दरपत्रक सुधारणा : आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एकत्रीकरण झाले असले तरी काही दरपत्रकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार असून, डॉक्टर, अधिकारी आणि इतर संबंधित घटक यामध्ये समाविष्ट असतील.

डॉक्टर भरती : मागील काही महिन्यांमध्ये ४०० एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्यात आली असून, एप्रिलनंतर आणखी डॉक्टरांची भरती केली जाईल.

१०८ रुग्णवाहिका सेवा : राज्यात १० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेतील जुन्या गाड्यांची जागा नव्या १७५० गाड्यांनी घेतली जाणार असून, त्या मोठ्या महामार्ग, रेल्वे स्थानक आणि महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केल्या जातील.

रुग्णांच्या तक्रारींवर लक्ष : अनेक मोठी खासगी रुग्णालये शासनाच्या जागेचा आणि सुविधांचा वापर करूनही योग्य सेवा देत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधी व न्याय विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त समितीमार्फत कठोर पावले उचलली जातील.

अधिकाऱ्यांसाठी मॉनिटरिंग यंत्रणा : महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णालयांना होणाऱ्या बिल देयकास विलंब होऊ नये यासाठी वित्त विभागासोबत समन्वय साधला जाईल.

शासनाने गोरगरिबांसाठी अनेक योजना लागू केल्या असून, त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच, या योजनेत आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, याचा आढावा घेण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल.

या लक्षवेधी सूचनेत विधान परिषद सदस्य भाई जगताप, श्रीमती उमा खापरे, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, अमित गोरखे, श्रीमती चित्रा वाघ, सदाभाऊ खोत, सुनील शिंदे, विक्रम काळे यांनीही भाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!