राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृती योजनेंतर्गत अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन, उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा विभागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला-मुलींना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी.एच.डी.साठी विविध अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली असून याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.30 एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
अटी व शर्ती : विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लक्ष (आठ लक्ष रुपये) इतके मर्यादित असावे. QS World Ranking नुसार ज्या विद्यापीठांचे नामांकन २०० च्या आत आहे, त्या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील 75 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 55 टक्के गुणांसहित पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 55 टक्के गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती ह्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार राहतील.
लाभाचे स्वरुप : सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी 2 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी एक वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा. तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा देय राहील.
प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारच्या इंडियन ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजने अंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के. वगळून) 15,400 यु.एस. डॉलर्स आणि यु.के. साठी 9900 जीबीपी इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी व शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेस इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी https://fs.maharshtra.gov.in या वेबसाईटवर विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन सादर करून त्यांची सुस्पष्ट प्रिंट ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत दि.30 एप्रिल, 2025 पर्यंत वेळ सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा, असे आवाहन अमरावती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी केले आहे.