आदित्य ठाकरेवर आरोपांनंतर करुणा शर्मा मैदानात; पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करत न्यायाची मागणी

मुंबई :- बॉलीवूडचा दिवंगत अभिनेत सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरुन या सगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. दिशा सालियनच्या- वडिलांनी त्यांच्या याचिकेत महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर ठपका ठेवला आहे. माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय सतीश सालियन यांनी व्यक्त केला. त्यामुळे या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी गुरुवारी सभागृहात केली. यानंतर आता करुणा शर्मा यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
करुणा शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये दिशा सालियनप्रमाणे पूजा चव्हाण हिला न्याय देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे दिशा सालियनसाठी न्याय मागताय त्याप्रमाणे पूजा चव्हाणला पण न्याय द्या आणि सीबीआय चौकशी लावा, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण हे प्रकरण शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्याशी संबंधित आहे. महाविकास आघाडीच्या काळात याप्रकरणावरुन संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता करुणा शर्मा यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेच येण्याची शक्यता आहे. यावर सत्ताधारी गटातील नेते आणि आमदार काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अंबादास दानवेंचा सभागृहात हल्लाबोल
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा विषय भाजप आमदार चित्रा वाघ ताकदीनं मांडत होत्या. त्याचे काय झाले आता? एसआयटी यासंदर्भात लावण्यात आली आहे. न्यायालयात प्रकरण आहे, सर्व गोष्टी झालेल्या असताना पुन्हा तपास करा काही अडचण नाही. एसआयटी काय करते आहे? आम्हाला प्रश्न आहे. जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. पूजा चव्हाण हिच्या प्रकरणी देखील तीच भूमिका असायला हवी. महिलांचा आदर करतो मात्र राजकीय हेतूनं आरोप करणं चुकीचे आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहाचा उपयोग व्हायला पाहिजे, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले.
जयकुमार गोरेंचाही राजीनामा घ्या; अनिल परबांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
आदित्य ठाकरेंची केस किती दिवस चालू आहे. सीबीआय चौकशी सुरु आहे, एसआयटी चौकशी सुरु आहे. सगळे विषय बाजूला जावे म्हणून हे सुरु आहे का? सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, हे मनीषा कायंदे यांचं ट्विट आहे. मनिषा कायंदे यांनी सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. सरड्याला पण लाज वाटली. जयकुमार गोरे यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, घ्या ना त्याचा राजीनामा. विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून काहीही वागायचं. किरीट सोमय्याचा व्हीडिओ दिला होता त्याची चौकशी का नाही केली, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.